
5 ऑगस्टला पार पडत असलेल्या श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यावर कोरोना फैलावाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्या जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. कोरोना संकटामुळे सोहळ्याच्या दिवशी पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्याबरोबरच कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.
भूमिपूजनाच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर व्हीव्हीआयपी हजर राहणार आहेत. अयोध्येतील कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवस्था सज्ज ठेवल्या असून विविध यंत्रणांच्या बैठकांतून त्याचा आढावा घेतला जात आहे. राम जन्मभूमी ट्रस्टने या भूमिपूजन सोहळ्याचे ’न भूतो, न भविष्यती’ असे ऐतिहासिक आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. मात्र याचवेळी जिह्यातील कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशिष्ट नियमावली जारी केली आहे. याअंतर्गत 5 ऑगस्टला पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. या अनुषंगाने जन्मभूमी ट्रस्टनेही भक्तांना सोहळ्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष हजेरी न लावता घरीच टीव्हीवर सोहळा पाहण्याचे आवाहन केले आहे.


























































