श्री राम मंदिर निर्माणासाठीच्या ट्रस्टमध्ये दलित समाजाच्या सदस्याचाही समावेश होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येमध्ये श्री राम मंदिराच्या निर्माणासाठी ट्रस्ट स्थापन करणार असल्याची घोषणा केली. लोकसभेमध्ये केलेल्या घोषणेमध्ये त्यांनी या ट्रस्टचे नाव ‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ असेल असं सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ट्रस्टबाबत अधिक माहिती देताना सांगितले की यामध्ये 15 विश्वस्त असणार आहेत. या विश्वस्तांमध्ये एका दलित समाजाच्या सदस्याचाही समावेश असेल असेही त्यांनी सांगितले आहे. शहा यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

अमित शहा यांनी आणखी एक ट्विट केले आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की ‘देशाची आस्था आणि अतूट श्रद्धेचे प्रतीक असलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिराच्या निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिबद्धतेसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. आजचा दिवस हा संपूर्ण हिंदुस्थानासाठी अत्यंत हर्षाचा आणि गौरवाचा दिवस आहे’ शहा यांनी म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हिंदुस्थानच्या सरकारने अयोध्येत प्रभू श्री रामाच्या भव्य मंदिर निर्माणाप्रती आपली कटीबद्धता दाखवतानाच ‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेमध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी ट्रस्टच्या स्थापनेबाबतची माहिती दिली. या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारीत केल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थानी भव्यदिव्य मंदिर निर्माणासंदर्भात हा ट्रस्ट निर्णय घेण्यास स्वतंत्र असेल असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरासंदर्भात ऐतिहासिक निर्णय दिला होता. यामध्ये न्यायालयाने केंद्र सरकारला मंदिर निर्माणासाठी ट्रस्टच्या स्थापनेचे आदेश दिले होते. या आदेशानुसार या ट्रस्टचे गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.