
बहुचर्चित रणजित सिंह हत्याकांड प्रकरणात पंचपुलातील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारी शिक्षेचा फैसला जाहीर केला. न्यायालयाने स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू तथा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला आजन्म जन्मठेपेसह 31 लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच अन्य चार दोषींना आजन्म जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
राम रहीमसह कृष्ण कुमार, अवतार, जसवीर आणि सबदिल या चौघांना विशेष सीबीआय न्यायालयाने 12 ऑक्टोबरला दोषी ठरवले होते. त्या वेळी शिक्षेबाबत राखून ठेवलेला निकाल न्यायालयाने सोमवारी जाहीर केला. सुनावणी वेळी राम रहीमला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते. तो सध्या साध्वींच्या लैंगिक शोषण प्रकरणात रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
नेमके प्रकरण काय?
कुरुक्षेत्रामध्ये राहणाऱया रणजित सिंहची 10 जुलै 2002 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रणजित सिंह हा डेरा सच्चा सौदाचा मॅनेजर होता, तर राम रहीम त्याच डेराचा प्रमुख आहे. साध्वी लैंगिक शोषणातील निनावी चिठ्ठी रणजित सिंहने आपल्या बहिणीकडून लिहून घेतली, असा संशय होता. याच संशयातून रणजित सिंहची हत्या करण्यात आली होती.
19 वर्षांनंतर न्याय
रणजित सिंहची हत्या होऊन 19 वर्षे उलटल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने रणजित सिंहच्या कुटुंबीयांना न्याय दिला आहे. राम रहीम व इतर दोषींना ठोठावलेल्या दंडाची अर्धी रक्कम रणजित सिंहच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे.


























































