औद्योगिक मंदीमुळे उद्योजकाची आत्महत्या

1270

वाळूज एमआयडीसीत एका ५३ वर्षाच्या लघु उद्योजकाने आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विष्णू रामभाऊ काळवणे (रा.साक्षीनगर, सिडको वाळूज महानगर-१), असे त्यांचे नाव आहे. एमआयडीसीतील डब्ल्यू सेक्टर मध्ये श्री गणेश इंडस्ट्रीज या नावाने त्यांची कंपनी आहे.

उद्योगातील मंदीमुळे विष्णू यांच्या कंपनीतील उत्पादनात पन्नास टक्क्यांनी कमी झाले होते. कामाच्या ऑर्डरही कमी झाल्या होत्या. कामगारांना पूर्ण वेळ काम नसतानाही त्यांना पगार द्यावा लागत होता. यामुळे विष्णू हे आर्थिक अडचणीत आले होते. कमी उत्पादनामुळे खर्चाचा भार वाढत असल्याने त्यांच्याकडून मागील वर्षभरापासून जीएसटी थकला होता. जीएसटी अधिकाऱ्यांकडून कर भरण्यासाठी तगादा सुरू होता. आर्थिक अडचण असल्याने जीएसटी भरण्यासाठी त्यांनी वेळ मागितला होता, तो मिळाला नाही. या दबावामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी काळवणे यांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून सकाळी अकराच्या सुमारास मृत घोषित केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सोनावणे हे करत आहेत.

अनेक लघु उद्योजक आर्थिक तणावाखाली

वाळूज एमआयडीसीतील अनेक मोठे उद्योजक या लघु उद्योजकांकडून विविध सुट्या भागांचे उत्पादन करून घेतात. मात्र अनेक मोठ्या उद्योगांचे उत्पादन कमी झाल्याने तेच आठवड्यातून दोन दिवस कंपनी बंद ठेवत आहेत. त्याचा परिणाम लघु उद्योगावर होत आहे. त्यामुळे लघु उद्योजकांना वीज बील, विविध कर, कामगाराचा पगार, कंपनीचे मेन्टेनन्स तसेच अतिरिक्त भार वाढलेला जीएसटी भरण्यात कमी उत्पादनामुळे अडचणी येत आहेत. कर भरण्याची पूर्तता वेळेवर होत नसल्याने उद्योजक तणावात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या