
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपाइंला भाजप आणि शिंदे गटासोबत राहायचे आहे. त्यांनी आमचेही नाव घेणे आवश्यक आहे. मात्र, ते रिपाइंला विचारतही नसल्याची खंत रिपाइंचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
महाबळेश्वरातील रिपाइंच्या अभ्यास शिबिरात त्यांनी खदखद व्यक्त केली.
आठवले म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकांमध्ये रिपाइंला भाजप, शिंदे गटासोबत राहायचे आहे. त्यांनी आपले नाव घेणे आवश्यक आहे. मात्र, त्यांच्याकडून रिपब्लिकन पक्षाचे नाव विशेषकरून घेतले जात नाही. आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबत बोलणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आपल्यासोबत आहोत, हे लक्षात ठेवा,’’ असा इशाराही त्यांनी दिला.























































