
सामना प्रतिनिधी, मुंबई
रिपाइं कार्यकर्त्यांनी नाराजी विसरून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कामाला लागावे, अशा सूचना रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केल्या. जे कार्यकर्ते पक्षाच्या अधिकृत आदेशाविरोधात काम करतील त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येईल, असा इशारा आठवले यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या राज्य कमिटीच्या बैठकीचे आयोजन कलिना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे करण्यात आले होते. याकेळी आठवले यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात अनेक चांगली कामे झाली आहेत. आगामी काळात राज्य सरकारतर्फे अनेक महामंडळांत आरपीआयच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांना स्थान मिळणार आहे. राज्यात एका पदाधिकाऱ्याला मंत्रीपद मिळणार आहे तसेच केंद्र सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे कोणताही आततायी निर्णय न घेता सर्व राज्यात भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा ठरावही रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आला.
राज्यसभेच्या आश्वासनामुळे ईशान्य मुंबईचा आग्रह सोडला
मी यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली असताना रिपब्लिकन पक्षाच्या स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढून तीन वेळा जिंकलो होतो, मात्र कधीही मित्रपक्षाचे चिन्ह स्वीकारले नाही. त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्रपक्षाचे चिन्ह घेऊ नये. मला राज्यसभेवर पुन्हा पाठवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने ईशान्य मुंबईचा आग्रह सोडून दिला आहे. शिर्डी आणि नगरमध्ये माझा पराभव करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध असलेली नाराजी बाजूला सारून भाजपच्या सुजय विखेंना विजयी करण्यासाठी प्रचाराला लागा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
























































