
लाखो कोरोना रुग्णांचा मृत्यू अॅलोपॅथीमुळे झाला आहे, असे वादग्रस्त विधान केल्यानंतर रामदेवबाबांनी माफी मागितली खरी. मात्र, महत्त्वाच्या आजारांबाबत 25 प्रश्नांची समाधानकारक उत्तरे द्या, असे खुले आव्हान इंडियन मेडिकल असोसिएशनला (आयएमए) देत अॅलोपॅथीविरोधात तोफ डागणे सुरूच ठेवले आहे. रामदेवबाबा यांच्या आज प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओत हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
रामदेवबाबा यांनी माफी मागितली असली तरी आज त्यांच्या पतंलजी या आयुर्वेदिक कंपनीने आयएमए आणि फार्मा कंपन्यांना एक खुले पत्र लिहून आव्हान दिले आहे. रामदेवबाबांनी या पत्रात हेपेटायटिस, लिव्हर सोयराईसिस, हार्ट एनलार्जमेंट, मधुमेह 1 आणि 2, फॅटी लिव्हर, थायराईड,हृदयरोग, बायपास, माईग्रेन, पायोरिया, निद्रानाश, ताणतणाव, व्यसनाधीनता, राग या आजार आणि शारीरिक आणि मानसिक समस्यांवर अॅलोपॅथीमध्ये समाधानकारक उपचार आहेत का, असतील तर त्याची उत्तरे द्या, असे आव्हान दिले आहे. दरम्यान, जर अॅलोपॅथी ही सर्वगुणसंपन्न आणि सर्वशक्तीमान आहे तर मग या उपचार पद्धतीचा वापर करणारे डॉक्टर हे कधीच आजारी पडता कामा नये, असा प्रश्न केला आहे.


























































