वृक्ष लागवडीचा ‘रानमळा’ पॅटर्न राबवणार,मुंबई हिरवीगार करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

राज्यातील दुष्काळाचे चक्र, नापिकी, पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी पुण्यातल्या खेड तालुक्यातील रानमळा गावकऱ्यांनी सुरू केलेल्या वृक्ष लागवडीचा यशस्वी झालेला पॅटर्न मुंबईसह राज्यातल्या महानगरपालिकांच्या हद्दीत राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जन्म, शाळा-कॉलेज उत्तीर्ण, नोकरी लागल्याचा आनंद आणि निवडणुकीतील विजय द्विगुणित करण्यासाठी रानमळा गावातल्या गावकऱ्यांनी वृक्ष लागवड करून संपूर्ण गाव हिरवेगार आणि पर्यावरण समृद्ध करण्याचा प्रयोग यशस्वी केला. हाच ‘रानमळा पटर्न’ आता मुंबईसह राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये राबवण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला आहे.

जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतुबदल, पाण्याचे दुर्भिक्ष अतिवृष्टी व पुरावर मात करण्यासाठी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सरकारी पातळीवर हाती घेण्यात येतो पण पुणे जिह्यातल्या खेड, राजगुरूनगर तालुक्यातील रानमळा गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. या योजनेमध्ये आनंद साजरा करण्यासाठी या गावातील ग्रामस्थांकडून घराच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत, परसबागेत किंवा शेतीच्या बांधावर झाडांची खास करून फळझाडांची लागवड करण्यास सुरुवात केली. एखाद्या घरात जन्माला येणाऱ्या बालकाच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी गावात जन्मवृक्ष लावण्यास सुरुवात झाली. त्यासाठी ग्रापपंचायतीकडून फळझाड देण्यास सुरुवात केली. या रोपाचे संवर्धन व जतन करण्यास संबंधित घरातल्या कुटुंबातील सदस्यांनी सुरुवात केली.

रानमळा पॅटर्न राज्यभर

रानमळा गावात ही योजना यशस्वी झाली. त्यामुळे गाव हिरवेगार झाले आणि पर्यावरणालाही हातभार लागला. फळझाडातून गावकऱ्यांना उत्पन्नाचे साधनही मिळाले. मध्यंतरी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी रानमळा भागाचा दौरा केला. गावात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आता शहरी भागात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रानमळा पॅटर्न मुंबईसह राज्यातल्या इतर महानगरपालिका तसेच ग्रामपंचायतींमध्ये हा पॅटर्न राबवण्याचा शासन निर्णय वन विभाग तसेच नगरविकास व ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

 

लेकीप्रमाणे वृक्षांची जोपासना

लग्न झाल्यावर ‘शुभमंगल वृक्ष’ व ‘माहेरची साडी’ अशी योजना राबवली. विवाहित मुलींच्या माहेरच्या मंडळींना वृक्षांची-फळझाडांची रोपे देऊन मुलीच्या अनुपस्थित आपल्या लेकीप्रमाणे माया देऊन त्या झाडाची सोपासना-संवर्धन करण्यास सुरुवात झाली. विद्यार्थी दहावी-बारावी किंवा उत्तीर्ण झाल्यास अथवा नोकरी मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी झाड लावण्यास सुरुवात झाली. ग्रामपंचायत्aााrच्या निवडणुकीत विजयी झाल्यावर आनंद द्विगुणित करण्यासाठी वृक्षारोपण करण्याची प्रथा सुरू झाली.