
सलामीच्या लढतीत दिमाखदार विजय मिळवणाऱया मुंबईच्या क्रिकेट संघाला वानखेडे येथे झालेल्या दुसऱया लढतीत रेल्वेकडून सपाटून मार खावा लागला. आता सर्वाधिक 41 वेळा रणजी चॅम्पियन ठरलेल्या बलाढय़ मुंबईसमोर उद्यापासून मुंबईत सुरू होणाऱया रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ब’ गटातील लढतीत कर्नाटकचे आव्हान असणार आहे. ही लढत मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असेल. याप्रसंगी टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे व कसोटीपटू पृथ्वी शॉ यांच्या कामगिरीवर साऱयांच्या नजरा असणार आहेत. या लढतीनंतर दोघेही न्यूझीलंड दौऱयावर रवाना होणार आहेत. त्यामुळे या लढतीत त्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
एक विजय अन् एक पराभव
मुंबईच्या आतापर्यंत दोन लढती झाल्या आहेत. मुंबईने पहिल्या लढतीत बडोद्याला हरवले, तर दुसऱया लढतीत त्यांना रेल्वेकडून हार सहन करावी लागली. मुंबईने 6 गुणांची कमाई केलीय. कर्नाटकने तीन लढतींमधून 10 गुणांची कमाई केलीय. कर्नाटकला एका लढतीत विजय मिळवता आलाय. कर्नाटकच्या दोन लढती अनिर्णीत राहिल्यात.
मयांक अग्रवाल खेळणार नाही
हिंदुस्थानचे आगामी व्यस्त वेळापत्रक बघता बीसीसीआयने मयांक अग्रवालला रणजी लढतीत खेळू नकोस असे सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. पण तरीही करुण नायर, देवदत्त पडीकल, अभिमन्यू मिथुन यांच्या खांद्यावर कर्नाटकची जबाबदारी असणार आहे.
अय्यर, दुबे, शार्दुलची अनुपस्थिती
मुंबईचे काही खेळाडू हिंदुस्थानसाठी खेळत असल्यामुळे या रणजी लढतीत त्यांची अनुपस्थिती असेल. श्रेयस अय्यर, शिवम दुबे व शार्दुल ठाकूर यांची हिंदुस्थानी संघात निवड झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत ते खेळणार आहेत.
सूर्यकुमार, लाड, तरेवर मदार
अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ या दोन खेळाडूंच्या कामगिरीवर मुंबईचे भवितव्य अवलंबून असले तरी कर्णधार सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, आदित्य तरे या अनुभवी खेळाडूंवरही मुंबईची मदार असणार आहे. सरफराज खानलाही संधी देण्यात आली असल्यामुळे त्यालाही चमक दाखवण्याची संधी असेल. सूर्यकुमार यादवची हिंदुस्थानी ‘अ’ संघामध्ये निवड झाल्यामुळे तो ही या लढतीनंतर न्यूझीलंडला रवाना होणार आहे.

























































