Ranchi Air Ambulance Crash – 8 लाख रुपये भरून एअर अ‍ॅम्बुलन्स बुक केली, मात्र नियतीने घात केला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रांचीहून दिल्लीला रुग्णाला घेऊन चाललेली खासगी चार्टर एअर अ‍ॅम्बुलन्स कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर 23 मिनिटांनी कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि एअर अ‍ॅम्बुलन्स झारखंडच्या छतरा जिल्ह्यातील जंगलात कोसळली. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कंपनीकडे 8 लाख रुपये भरून मयत रुग्ण संजय कुमार यांच्या कुटुंबीयांनी एअर अ‍ॅम्बुलन्स बुक केली. मात्र नियतीने घात केला आणि संजय कुमार यांना वाचवण्याचा कुटुंबीयांचा शेवटचा प्रयत्नही धुळीस मिळाला.

लातेहार जिल्ह्यातील चांदवा येथील 41 वर्षीय संजय कुमार हे एक रेस्टॉरन्ट चालवत होते. गेल्या सोमवारी रेस्टॉरन्टमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत संजय कुमार 65 टक्के भाजले होते. त्यांच्यावर गेल्या सहा ते सात दिवसांपासून रांचीच्या देवकमल रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना चांगल्या उपचारांसाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला. कुटुंबाने तात्काळ रेडबर्ड एअरलाइन्सकडे एअर अ‍ॅम्बुलन्स बुक केली, ज्याचे एकूण भाडे 8 लाख रुपये होते.

मृत संजय कुमार यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर अ‍ॅम्बुलन्ससाठी त्यांनी कंपनीकडे साडेपाच लाख रुपये आगाऊ जमा केले. मात्र उड्डाण घेण्यापूर्वी कंपनीने उर्वरित 2.5 लाख रुपयांची मागणी केली. उर्वरित रक्कम भरल्याशिवाय एअर अ‍ॅम्बुलन्सने उड्डाण करण्यास नेण्यास नकार दिला.

कुटुबीय चांदवा येथे घरी गेले आणि उर्वरित अडीच लाख रुपयांची व्यवस्था करून रांचीला परतले. उर्वरित रक्कम जमा केल्यानंतर विमान संध्याकाळी 7.11 वाजता टेकऑफसाठी तयार झाले. विमानात संजय, त्यांची पत्नी अर्चना देवी, नातेवाईक धुरु कुमार, क्रिटिकल केअर डॉक्टर विकास कुमार गुप्ता, पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा आणि दोन पायलट, कॅप्टन विवेक विकास भगत आणि कॅप्टन सवराजदीप सिंग होते.

उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 23 मिनिटांनी एअर अ‍ॅम्बुलन्सचा कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. खराब हवामान आणि वळवण्याच्या प्रयत्नात विमान छतरा जिल्ह्यातील सिमरिया पोलीस स्टेशन परिसरातील जंगलात कोसळले. या अपघातात सर्व सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

एकीकडे, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष सुरू होता. दुसरीकडे, सतत पैशांची मागणी होत होती. या घटनेमुळे आपत्कालीन परिस्थितीत एअर अ‍ॅम्बुलन्स सेवांच्या पारदर्शकतेवर आणि मानवतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. अपघात प्रकरणी डीजीसीए आणि एएआयबी तपास करत आहेत.