निवडणूक आयोगाची आचार संहिता की मोदींची प्रचारसंहिता; काँग्रेसचा गंभीर आरोप

surjewala

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प. बंगालमधील हिंसाचारानंतर निवडणू आयोगाने प्रचार 20 तास आधी म्हणजेच गुरुवारी रात्री 10 पासून बंद करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर काँग्रेसने यावर टीका केली आहे. निवडणूक आयोगाची आचार संहिता की मोदींची ‘प्रचार’संहिता असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी केला.

काँग्रेसने गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य करताना निवडणूक आयोगवर गंभीर आरोप केले आहेत. ‘आयोगाच्या या निर्णयामुळे बंगालमधील प्रचार 20 तास आधी थांबणार आहे. पण असा निर्णय घेण्यामागे मथुरापूर आणि डमडम येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा पार पडू द्याव्यात आणि त्यानंतर प्रचार बंद व्हाव्या, हे कसे काय शक्य आहे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी बोलताना रणदीप सुरजेवाला यांनी भाजप समर्थकांचा उल्लेख गुंड म्हणून केला. ‘कोलकाता येथे जो हिंसाचार झाला त्याप्रकरणी गुंडांना ज्याचे नेतृत्व अमित शहा करत होते, त्यांना शिक्षा देण्याऐवजी लोकशाहीलाच आयोगाने शिक्षा केली आहे’, असा आरोप त्यांनी केला. ‘बंगालमधील परिस्थिती हाताळण्यास निवडणूक आयोग असमर्थ असल्याचे दिसत असून त्यांनी घेतलेला निर्णय म्हणजे एक प्रकारे देशाच्या राज्यघटनेचा माफ न करता येण्यासारखा पराभवच म्हणावा लागेल, अशा शब्दात त्यांनी टीका केली.

देशातील प्रत्येक नागरिक आज निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्य, निष्पक्षता, निर्णयक्षमता, न्याय याप्रश्न उपस्थित करत असल्याचेही ते म्हणाले. निवडणूक आयोग आज मोदी आणि त्यांच्या दबावाखाली आले आहेत, असेच चित्र आल्याचे समोर आल्याचे ते म्हणाले.