रांगव धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

संगमेश्वर तालुक्यातील रांगव येथील लघु पाटबंधारे विभागाच्या धरणाची सुरक्षा सध्या अनेक बाबींमुळे ऐरणीवर आली आहे. धरणाच्या भिंतीवर वाढलेली मोठमोठी झाडे धरणाच्या भिंतीला भविष्यात धोका निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. धरणाच्या बाजूच्या डोंगराला गेल्या अनेक वर्षांपासून तडे जात असून याठिकाणी सुरक्षेच्या अनेक त्रुटी दिसून येत असल्याने या धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर येत आहे. लघु पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

1984 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर जलसंपदा विभाग, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे व दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, ओरोस यांच्या माध्यमातून या धरणाचे काम सुरू करण्यात आले. फाळके कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम केले आहे. या धरणाला डावा कालवा 5.64 किलोमीटर, तर उजवा कालवा 3.81 किलोमीटर इतका प्रस्तावित असून, हे काम अद्याप अपूर्णच आहे. मागील काही वर्षांपासून धरणाभोवती असणाऱ्या डोंगराना भेगा पडून डोंगर सरकण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, यामुळे धरणाला धोका नसल्याचा निर्वाळा लघु पाटबंधारे विभागाकडून यापूर्वीच देण्यात आला आहे. धरणाच्या रिंगरोडची अवस्थाही बिकट असून, धरणाच्या आजूबाजूच्या जमिनी येथील स्थानिक मध्यस्थांनी परजिल्ह्यातील लोकांना विकल्या आहेत. हे जमीनमालकही येथे अतिक्रमण करत असल्याचे यापूर्वीचे उघड झाले आहे.

सध्या या धरणाच्या भिंतीवर फार मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भिंतीवरील झाडे तोडण्यात आली नसल्याने झाडांनी धरणाला वेढले आहे. या झाडांची मुळे धरणात खोलवर पसरली असून, धरणाचे पिचिंग यामुळे सैल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात या भिंतीला धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. या धरणाच्या साफसफाईकरिता गेल्या अनेक वर्षात निधीच उपलब्धच झाला नाही की, हा निधी गायब झाला, असा सवाल उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणाची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. धरण परिसरात विक्री झालेल्या जमीन प्रकरणाची तसेच या जमिनी विकसित करण्यासाठी धरण परिसरात झालेल्या अवैध वृक्षतोड व अवैध उत्खनन याचीही चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या धरणाच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्यात यावीत व अपूर्ण राहिलेली कामेही पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी या धरण परिसरातील जनतेमधून करण्यात येत आहे.

धरणाचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षे झाली असली तरी याचा फायदा स्थानिकांना झालेला नाही. दोन्ही कालव्याची कामे अर्धवट आहेत. धरणावर असणारे सुरक्षा फलकही सुस्थितीत नसून सुरक्षा रक्षकासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. धरण परिसरातील जमिनी विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन व बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. मात्र, यावेळी जमीन घेणारे परजिल्ह्यातील धनदांडगे यांना सोडून स्थानिक जमीनमालकांना वेठीस धरण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या