
Ranji Trophy 2025-26 मध्ये महाराष्ट्र विरुद्ध केरळ सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची नादखुळा फलंदाजी पाहायला मिळाली. केरळच्या गोलंदाजांनी फलंदाजीसाठी उतरलेल्या महाराष्ट्राची भंबेरी उडवल्याने संघ 100 धावांपर्यंत मजल मारणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. कराण 0 वर 4 आणि 18 धावसंख्येवर महाराष्ट्राचा अर्धा संघ तंबुत परतला होता. परंतु या परिस्थिती ऋतुराज गायकवाडने संघाचा डाव सावरला आणि एकट्याने खिंड लढवली. 9 धावांनी त्याचं शतक हुकलं मात्र त्याच्या खेळीने सर्वांची मन जिंकली.
नाणेफेक जिंकल्यानंतर महाराष्ट्राने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतू केरळच्या गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी करत महाराष्ट्राची फलंदाजी उधळून लावली. पृथ्वी शॉ, सिद्धेश वीर, अर्शिन कुलकर्णी आणि अंकित बाव या चौघांना भोपळाही फोडू दिला नाही. तर सौरभ नवाळे (18) देखील आल्या पावली माघारी पतला. त्यामुळे 18 धावसंख्येवर महाराष्ट्राच्या पाच विकेट गेल्या. अशा कठीण परिस्थितीत ऋतुराज गायकवाडने संयमी फलंदाजी करत जलज सक्सेनाच्या सोबतीने संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून 122 धावांची महत्त्वपूर्ण भागी केली. ऋतुराजने 151 चेंडूंचा सामना करत 11 चौकारांच्या मदतीने 91 धावांची खेळी केली. तर सक्सेनाने 106 चेंडूंचा सामना 49 धावा केल्या. त्यामुळे दिवसाअखेर महाराष्ट्राने 7 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा केल्या आहेत. एमडी निधीशने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर नेदुमंकुझी तुळसने 2 आणि ईडन अॅपल टॉमने एक विकेट घेतली आहे.


























































