
Ranji Trophy 2025-26 चा हंगाम आजपासून (15 ऑक्टोबर 2025) सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी केएस भरतने शतक ठोकून सर्वच संघांना आपल्या फलंदाजीची एक झलक दाखवून दिली आहे. आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांच्यामध्ये पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात 32 वर्षीय केएस भरतने संयमी फलंदाजी करत 142 धावांची खेळी केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाअखेर आंध्र प्रदेशने तीन गड्यांच्या मोबदल्यात 289 धावा केल्या आहे.
आंध्र प्रदेशेन नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि उत्तर प्रदेशला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीला आलेल्या अभिषेक रेड्डी आणि श्रीकर भरत यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. अभिषेक रेड्डी (36) लवकर माघारी परतला परंतू तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शेख राशिदने त्याची कमतरता जाणवून दिली नाही. त्याने दिवसा अखेर 197 चेंडूंचा सामना करत 97 धावांची नाबाद खेळी केली आहे. तत्पूर्वी श्रीकर भरतने आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवत गोलंदाजांची चांगली शाळा घेतली. त्याने 175 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. तर 244 चेंडूंचा सामना करत 13 चौकारांच्या मदतीने 142 धावांची खेळी केली. त्यामुळे पहिल्या दिवसाअखेर आंध्र प्रदेशने 3 गड्यांच्या मोबदल्यात 289 धावा केल्या आहेत. तर शेख राशीद 94 धावांवर नाबाद फलंदाजी करत आहे.
श्रीकर भरतने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. रणजी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकणारा तो पहिला यष्टीरक्षक फलंदाज आहे. 2014-15 च्या हंगामात त्याने गोवाविरुद्ध 311 चेंडूंचा सामना करत 308 धावांची अविस्मरणीय फलंदाजी केली होती. तसेच त्याने 7 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. परंतु त्याची बॅट आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप तरी तळपली नाहीय. त्याने 12 डावांमध्ये फक्त 221 धावा केल्या आहेत.