
IPL मध्ये धमाकेदार कामगिरीमुळे क्रीडा विश्वात वैभव सूर्यवंशीच्या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटसह इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुद्धा त्याने विस्फोटक फलंदाजी करत आपलं नाण खणखणीत वाजवलं. आता वैभव सूर्यवंशी रणजी ट्रॉफी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. बिहारच्या संघात त्याची निवड करण्यात आली असून त्याची संघाच्या उपकर्णधापदी निवड केली आहे.
बिहार क्रिकेट असोसिएशनने रविवारी (12 ऑक्टोबर 2025) रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या पहिल्या दोन सामन्यांसाठी शकिबुल गनी याची कर्णधार तर वैभव सुर्यवंशीची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. वैभव सूर्यवंशीने 19 वर्षांखाली हिंदुस्थानच्या संघातून खेळताना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेत्रदिपक फलंदाजी केली होती. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने 355 धावा तर एका सामन्यात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम सुद्धा केला होता. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार दिवसीय कसोटी सामन्यात 78 चेंडूंमध्ये ताबडतोड शतक ठोकलं होतं.
साखळी फेरीतील बिहारचा पहिला सामना 15 ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सामना मणिपरविरुद्ध 25 ऑक्टोबरपासून खेळला जाणार आहे.
पहिल्या दोन सामन्यांसाठी बिहारचा संघ
शकिबुल गनी (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), पियुष कुमार सिंग, भास्कर दुबे, अर्णव किशोर, आयुष आनंद लोहरुका (यष्टीरक्षक), बिपीन सौरभ (यष्टीरक्षक), आमोद यादव, नवाज खान, साकिब हुसेन, राघवेंद्र प्रताप सिंह, सचिन कुमार सिंह, हिमांशू सिंह, खालिद खान आणि सचिन कुमार.