
आगामी रणजी करंडकाच्या हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने नवा कर्णधार जाहीर केला असून अनुभवी अष्टपैलू शार्दुल ठाकूरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. हिंदुस्थानसाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी करणारा ठाकूर आता मुंबई रणजी संघाचा ‘नवा सेनापती’ म्हणून क्रिकेटभूमीवर उतरेल.
मुंबईचा पहिला सामना 15 ऑक्टोबरपासून श्रीनगरमध्ये जम्मू आणि कश्मीरविरुद्ध रंगणार आहे. 42 वेळा रणजी करंडकाचे विजेतेपद पटकावणाऱ्या या परंपरागत संघाने अजिंक्य रहाणेच्या जागी शार्दुल ठाकूरची नेमणूक करत नव्या हंगामाचा सूर लावला आहे.
गेल्या हंगामात मुंबईला जम्मू आणि कश्मीरकडून पाच विकेट्सचा पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे यंदा शार्दुलच्या नेतृत्वाखाली संघ त्या पराभवाचा बदला घेण्याच्या निर्धारात आहे. मुंबईचा समावेश हिमाचल प्रदेश, दिल्ली, हैदराबाद, राजस्थान, छत्तीसगड आणि पुद्दुचेरीसह एलिट ग्रुप ‘डी’ मध्ये झाला आहे.
संघात अनुभवी फलंदाज सरफराज खान आणि अष्टपैलू शिवम दुबे यांचा समावेश असून दुखापतीनंतर पुनरागमन करणारा मुशीर खान हाही संघात परतला आहे. तथापि, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीची खंत जाणवणार आहे.
मुंबई रणजी संघ ः
शार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे, सरफराज खान, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसूझा, इरफान उमैर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, रॉयस्टन डायस.