आता रणजी स्पर्धेतही बदल होणार

250

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच खेळाडू, सपोर्ट स्टाफचे आरोग्य व सुरक्षा याकडे लक्ष देऊन नियमावली बनवली. आता आगामी मोसम सुरू होण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. रणजी व मुश्ताक अली टी-20 या दोन स्पर्धा खेळवण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. याप्रसंगी रणजी या देशातील प्रतिष्ठत स्पर्धेच्या नियमात काही बदल करून ही स्पर्धा पार पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू व सपोर्ट स्टाफला जास्त प्रवास करावा लागू नये हे डोळ्यांसमोर ठेवून योजना बनवण्यात येणार आहे. एका गटातील सर्व संघ दोन शहरांतील चार मैदानांवर लढती खेळण्याची शक्यता आहे अशी माहिती एका दैनिकामधून देण्यात आली आहे.

आगामी रणजी स्पर्धेत संघांची पाच गटांत विभागणी करण्यात येणार आहे. ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ या तिन्ही गटांत प्रत्येकी आठ संघांचा समावेश असणार आहे. ‘डी’ गटामध्ये सहा, सात किंवा आठ संघ असण्याची शक्यता आहे. ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ या गटांतील प्रत्येकी दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील. उत्तरेकडील सहा संघ ‘ई’ गटामध्ये असतील. यावर्षी पहिल्यांदाच नव्या फेरीचा समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. ‘डी’ गटातील विजेता व ‘ई’ गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत भिडणार. यामधील विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करील.

‘ए’, ‘बी’ व ‘सी’ गटातील तळाला असलेल्या संघाची ‘डी’ गटात गच्छंती केली जाईल. तसेच ‘डी’ गटातील अव्वल तीन संघांना ‘ए’, ‘बी’ व ‘सी’ गटात प्रमोशन दिले जाईल. ‘डी’ गटातील तळाच्या संघाला ‘ई’ गटात जावे लागेल. तसेच ‘ई’ गटातील टॉपच्या संघांना ‘डी’ गटात प्रवेश देण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या