
सामना प्रतिनिधी । जामटा
विदर्भ आणि सौराष्ट्र यांच्यातील रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये दुसर्या दिवसअखेर बरोबरीचा सामना झाला. विदर्भाने पहिल्या डावात 120.2 षटकांत 312 धावसंख्या उभारल्यानंतर सौराष्ट्रनेही प्रत्युत्तरादाखल उर्वरित 59 षटकांच्या खेळात 5 बाद 158 धावांपर्यंत मजल मारली. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा स्नेल पटेल 87 धावांवर खेळत होता, तर प्रेरक मंकड 16 धावांवर त्याला साथ देत होता. विदर्भ अजूनही पहिल्या डावात 154 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 5 फलंदाज शिल्लक आहेत.
विदर्भाच्या 312 धावांना प्रत्युत्तर देताना सौराष्ट्रची आघाडीची फळी अपयशी ठरली, मात्र आघाडीवीर स्नेल पटेलने एका बाजूने किल्ला लढविल्यामुळे सौराष्ट्रचा प्रतिकार सुरू आहे. चेतेश्वर पुजारासह (1) हार्विक देसाई (10), विश्वराज जाडेजा (18), अर्पित वसावडा (13) व शेल्डॉन जॅक्सन (9) या आघाडीच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले, मात्र स्नेल पटेलने 160 चेंडूंच्या संयमी खेळीत नाबाद 87 धावांची खेळी करताना 14 चेंडू सीमापार पाठविले. त्यामुळे उद्या पहिल्या डावात कोणता संघ आघाडी घेतो याकडे तमाम क्रिकेटशौकिनांच्या नजरा असतील. विदर्भाकडून सरवटेने 3 तर वाखरेने 2 फलंदाज बाद करून सौराष्ट्रला रोखण्याचा प्रयत्न केला.
कर्णेवार-वाखरे जोडीने विदर्भाला सावरले
त्या आधी विदर्भाने पहिल्या दिवसाच्या 7 बाद 200 धावसंख्येवरून सोमवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. रविवारी 31 धावांवर नाबाद परतलेला अक्षय कर्णेवार व शून्यावर नाबाद असलेल्या अक्षय वाखरे या जोडीने दुसर्या दिवशी सुरेख फलंदाजी केली. कर्णेकारने नाबाद 73 धावांच्या खेळीत 160 चेंडूंना सामोरे जाताना 8 चौकारांसह 2 षटकार लगावले. वाखरेने 78 चेंडूंत 3 चौकारांसह 34 धावांची खेळी केली. या दोघांनी नवव्या गडय़ासाठी 78 धावांची भागीदारी केली. वाखरे बाद झाल्यानंतर उमेश यादवनेही 13 धावांचे योगदार दिल्याने विदर्भाला तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. सौराष्ट्रकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक 3 बळी टिपले. चेतन सकारिया व कमलेश मकवाना यांनी 2-2, तर प्रेरक मंकड व धमेंद्रसिंग जाडेजा यांनी 1-1 फलंदाज बाद केला.




























































