राष्ट्रवादीला जोरदार चपराक देत रणजीतसिंह यांचा भाजप प्रवेश, वाचा काय म्हणाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजीतसिंह यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला जोरदार दणका दिला आहे. आघाडी सरकारच्या काळात रखडलेली कामे युती सरकारच्या काळात मार्गी लागल्यानेच भाजपत प्रवेश केल्याचे रणजीतसिंह यांनी सांगितले. विजयसिंह यांनी जिल्ह्यातील पाणी आणि सिंचनाची समस्या सोडवण्यासाठी अनेक योजना आणल्या. मात्र, आधीच्या सरकारने विजयसिंह यांना श्रेय मिळू नये यासाठी त्या योजनांकडे दुर्लक्ष केले अशी खंत रणजीतसिंह यांनी व्यक्त केली. मात्र, भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी गटतट आणि राजकाण बाजूला ठेवत त्यातील अनेक योजनांना गती दिली. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत, असे ते म्हणाले. केंद्रातील भाजप सरकारनेही राज्यासाठी भरीव काम केले आहे. गावागवात रस्ते पोहचले आहेत. भाजपच्या या कामाने प्रभावित होऊन आपण भाजपसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. समर्थकांसह रावसाहेब दानवे यांच्याकडून भाजपचा झेंडा हाती घेऊन भाजपात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील राजकीय आणि सामजिक क्षेत्रातील महत्त्वाची घराणी भाजपात येत असल्याने राज्यात 45 नाही तर सर्वच्या सर्व 48 जागा भाजपच जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आधीच्या सरकारमध्ये मोहिते पाटलांना डावलण्यात आले होते. भाजपमध्ये त्यांचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल आणि त्यांच्या विकासाच्या योजनांनी गती देण्यात येईल असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. रणजीतसिंह भाजपात आल्याने माढामध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी रणजीतसिंह यांचे भाजपमध्ये स्वागत केले.