
सामना प्रतिनिधी । लातूर
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे नागेवाडी येथे एका विधवा महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांत तक्रार करणार म्हटल्यानंतर आरोपीने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गावातील योगेश प्रताप शिंदे हा महिलेच्या घरात घुसला. महिलेचा मुलगा शाळेत गेला होता, त्यामुळे ती घरात एकटीच होती. योगेश तिथेच दारू प्यायला आणि फिर्यादी सोबत जबरदस्ती करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केल्याने तो घरातून पळून गेला.
पुन्हा तो फिर्यादीच्या घरी आपल्या पत्नीला सोबत घेऊन आला. त्यावेळी पीडित महिलेने मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करते असे म्हटल्यानंतर योगेश प्रताप शिंदे आणि त्याची पत्नी भाग्यश्री योगेश शिंदे या दोघांनी पीडितेस मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.


























































