4 महिने विरह सहन करणारी पत्नी नवऱ्याला भेटायला निघाली, ट्रकचालकाने बलात्कार केला

11682
प्रातिनिधिक फोटो

लॉकडाऊनमुळे 4 महिने विरह सहन करणाऱ्या महिलेने पुण्यात राहणाऱ्या तिच्या नवऱ्याला भेटायचं ठरवलं. या प्रयत्नात असताना उरणमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही महिला अवघअया 18 वर्षांची आहे. पनवेल पोलिसांनी तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तातडीने हालचाल करत शोधून काढत अटक केली आहे.

या महिलेचं अवघ्या सात महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. महिलेचा नवरा हा मजूर काम करतो आणि तो पुण्याला सध्या कामाला आहे. लग्नानंतर नवरा कामावर परतला आणि लॉकडाऊन घोषित झाला, ज्यामुळे तिला नवऱ्याकडे जाता आलं नव्हतं. या दोघांनी पुण्यातच राहायला यायचं ठरवलं होतं. यामुळे लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर तिने नवऱ्यासोबत राहायला जायचं ठरवलं होतं. उत्तर प्रदेशच्या महूवडी गावची रहिवासी असलेली ही महिला श्रमिक ट्रेनने मुंबईला आली होती. तिला सल्ला देण्यात आला होता की कल्याणला जा आणि तिथन पनवेलला जा. पनवेलवरून तुला पुण्याला कोणीही सोडेल.

मुंबईला उतरल्यानंतर या महिलेने लोकल ट्रेनने कल्याण गाठले. तिथून तिने पनवेलची बस पकडली. बुधवारी पहाटे ही महिला कळंबोली नाक्यावर पोहोचली होती. पहाटे 1.15 च्या सुमारास विकास सिंह नावाच्या ट्रक ड्रायव्हरने या महिलेला पाहिलं. त्याने तिला त्याच्या ट्रेलरमधून पुण्याला सोडण्याचं आश्वासन दिलं. मात्र त्याने ट्रेलर पुण्याच्या दिशेने न नेता उरणकडे नेला आणि निर्मनुष्य जागी त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने या महिलेला तिथेच फेकून दिलं आणि पळ काढला.

या महिलेने कठीण प्रसंगातही प्रसंगावधान राखत ट्रेलरचा नंबर मोबाईलमध्ये नोंदवून ठेवला. तिने पोलिसांशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला आणि ट्रेलरचा नंबरही दिला. महिला पोलीस कर्मचाऱ्यासह एक तुकडी घडनास्थळी पोहोचली आणि त्यांनी या महिलेला आधार दिला. पहाटे 3.30 च्या सुमारास पोलिसांनी पशअचिम रेल्वेच्या गोदाम परिसरात ट्रेलरचा शोध घ्यायला सुरुवात केली, कारण बहुतांश ट्रेलर इथेच थांबवण्यात येतात. पोलिसांना महिलेने दिलेल्या नंबरचा ट्रक सापडला, त्यांनी आरोपीला शोधून काढला आणि खाली उतरण्यास सांगितलं. यावर विकास सिंह याने ट्रेलर सुरू केला आणि पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. जवळपास 45 मिनिटे पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी पळस्पे फाट्याजवळ ट्रेलर अडवला आणि आरोपीला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या