
आदीती सारंगधर
आपले पेट्स म्हणजे आपली बाळंच असतात की… त्यांना फक्त खायला दिलं… राहायला सुसज्ज घर दिलं… या एवढय़ाच गोष्टी करून भागत नाही… तर भरपूर प्रेम… संस्कार आणि शिस्त या सगळ्याच गोष्टी या ‘बाल’ संगोपनासाठी आवश्यक असतात.
गेले अनेक महिने, आठवडे ‘जिवलग’च्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आपण जोडले जातोय. पण त्या दिवशी डोक्यात एक विचार आला की घरी पेट आणलं-आलं की सगळेच छान सांभाळतायत. पण काही जाती अशा असतात ज्या खात्रीलायक ब्रीडर्सकडूनच घ्याव्या लागतात…
नुसतं दोन भिन्नलिंगी जातीत मेटिंग केलं म्हणजे झालं ब्रीडिंग असं नसतं. स्वच्छता बाळगावी लागते. मेडिकल एक्सपर्टस् लागतात. योग्य औषधांचा साठा जवळ लागतो. ब्रीडिंग टू डिलिव्हरी ही अख्खी प्रोसेस त्या प्राण्याची नीट काळजी घ्यावी लागते. त्यांचे पिंजरे अथवा खोली अत्यंत सुसज्ज ठेवावी लागते. त्यांच्या खाण्यापिण्याचे रेकॉर्डस् ठेवावे लागतात. रिक्वायरीज लक्षात घेऊन ब्रीडिंग करावं लागतं. कधी कधी कॉम्पिटिशनसाठी विशिष्ट जातीची मागणी असते. त्यासाठी त्यांचे जीन्स आणि जेनेटिक्स यांचा विचार करून दोघांमध्ये त्याच्या टेस्टस् पडताळून ब्रीडिंग करावं लागतं. कधी कधी जन्माच्या वेळी अडचणी येऊ शकतात. कुत्रे, मांजर, घोडे, गाय, बैल, मेंढरं, ससे, मासे काही स्पेसिफिक आणि दुर्मिळ पक्षी, सरपटणारे प्राणी अशा सगळय़ांचं ब्रीडिंग करता येतं. पण काहीजण काही विशिष्ट प्रजातींमध्ये प्रावीण्य मिळवून फक्त त्यांचंच प्रजनन करतात.
मुळात दोन प्राण्यांना चांगल्या वातावरणात एकत्र आणून समेट घडवून प्रजनन करून अगदी बाळ जन्माला येईपर्यंत सांभाळणे हीच प्रक्रिया किती सुंदर आणि जबाबदारीची आहे ना! एका नवीन जिवाला जन्माला घालण्याची सगळी मदत… जवळजवळ त्या सगळय़ा बाळांची दुसरी आई बनणं.
घरी कुत्रा आणला, डॉक्टरांकडून गरजेच्या लसी टोचून आणल्या… वेळ मिळेल तेव्हा त्याला आंघोळ घातली, जमेल तेव्हा किंवा मूड असेल तेव्हा त्याच्याशी खेळायचं, बोलायचं… आपल्या सोयीने त्याच्यावर चिडायचं. शी सू करून आणायची. दोन वेळा खाली फिरायला न्यायचं इतकं केलं की झालं. संपली जबाबदारी असं नसतं…
तुम्हाला मज्जा म्हणून या पिलाला घरी नेऊ नेऊ नका. जमणार आणि परवडणार असेल अशीच जात शोधा आणि घरी न्या. स्ट्रे डॉग्ज म्हणजे रस्त्यावरची कुत्र्याची पिल्लं घरी आणली तरी त्यांना न्यूट्रिशन हे लागतंच ना. मग फक्त घरी चिकन भात किंवा दूध चपाती खाऊन ते कसं मिळणार?
सांभाळायला सगळय़ात सोपी जात आहे लॅब्रॅडोर. पेडीग्री किंवा रॉयल कॅनन त्यांच्या वयाच्या अनुषंगानं त्यांना भरवायचे, कधीतरी घरातलं जेवण… वेळ काढून दिवसातून दोनवेळा 45-45 मिनिटे खाली चालायचं, व्यायामाला नेणं. त्यांचं वजन आटोक्यात ठेवायचं आणि त्यांच्याशी खूप बोलायचं, कम्युनिकेट करायचं. कारण हे खूप सगळय़ात महत्त्वाचं असतं. आपण बोललो नाही, त्यांना दुर्लक्षित केलं, समजून घेतलं नाही तर ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. त्यांच्या वागण्यात अत्यंत गंभीर असा बदल होऊ शकतो. ते आक्रमक होऊ शकतात. काही एकटे पडून बोलेनासे, खेळेनासे, संपर्क कक्षेच्या बाहेर जातात आणि काहींचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अर्थात हे मानसिक आरोग्य सांभाळणं सगळय़ाच कुत्र्यांच्या बाबतीत असतं. पण काही मुलं कशी अत्यंत उद्योगी आणि व्रात्य असतात, काही मुलं शांत. काही अबोल असतात तर काही बडबडी. त्यांना जसं वेगवेगळय़ा पद्धतीनं हॅण्डल करावं लागतं तसंच कुत्र्यांचं आहे. रॉट व्हायलर, डॉबरमन, जर्मन शेफर्ड या त्यातल्या त्यात आक्रमक जमाती आहेत. प्रेमानं सांगून कळलंच तरी रागावर कंट्रोल नसतो त्यांचा बऱयाचदा. त्यामुळे त्यांच्या बाबतीत थोडं कडक राहावं लागतं मास्टर्सना. माझा डॉग माझ्याबरोबरच बेडवर झोपतो हे अत्यंत चुकीचं वागणं आहे. कारण प्रेम कितीही करत असलात तरी मुलानं शिस्तीतच वागायला हवं. मी जेवढा उंच ठिकाणी तेवढा मी सुपीरियर अशी भावना कुत्र्यांमध्ये निर्माण होते. त्यामुळे त्यांना शक्यतो खालीच बेड करून द्यावा. माझं बाळ म्हणून जे चोरून एक बिस्कीट देतो ते जरा टाळा आणि बघा त्यांची त्वचा कशी होते. शित्झू, लासासारख्या कुत्र्यांच्या केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यात उवा, लिखा होऊ नयेत म्हणून ते सतत कापावे लागतात. आंघोळ नियमित लागतेच पण त्वचा पूर्ण सुकवावीही लागते.
मांजरांच्या वेगवेगळय़ा प्रजाती असतात. त्यांचीसुद्धा काळजी घ्यावी लागते. स्वावलंबी असतं म्हणून सोडून देऊन चालत नाही. काही लोकांना घोडय़ांची आवड असते. त्यामुळे घोडे ठेवतात. पण त्यातही अनेक मुद्दे असतता. बुटीया, चुम्मारवी, डेक्कनी, काठेवाडी, पोनी, मारवाडी, सिकांग, स्पिटी अशा अनेक जाती आहेत. रेससाठी काठेवारी घोडे धावतात. त्यांची नीट निगा राखावी लागते. अनेक लाखांपर्यंत या घोडय़ांना मागणी असते. त्यामुळे नुसतं ब्रीडिंग केलं की विषय संपला असं नाही होत. कधी कधी ज्यांच्यासाठी ब्रीडिंग करतो ती पार्टी बॅक आऊट होते. कधी जन्माला आलेलं मूल डिफेक्टिव्ह असलं तर लोक घेत नाहीत. अशावेळी ती जबाबदारी घ्यावी लागते. त्यांना फॉस्टर करावं लागतं. सांभाळावं लागतं. ऍडॉप्शनसाठी ठेवावं लागतं. ज्या घरी ती बाळं जाणार आहेत तिथे त्यांचे संगोपन नीट होईल की नाही हे पडताळावं लागतं. सुंदर सुंदर बेबीजचं पण ट्राफिकिंग होतं. चुकीच्या कामासाठी आणि फॉल्स ब्रीडिंगसाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. कधी कधी प्रयोग सिद्ध करण्यासाठी त्यांच्यावर केले जाऊ शकतात. आपल्या परीनं हे सगळं टाळता येण्याचे सगळे प्रयत्न करावे लागतात. अर्थात प्रत्यक्षरित्या या सगळय़ासाठी अनेक संस्था कार्यरत असल्या तरी माझ्याकडून बाळ घ्यायला आलेल्या प्रत्येक पालकाला मला या गोष्टी समजावून सुजाण पालकत्व द्यायचं असतं.
तशा अनेक गोष्टी आहेत. मुळात तुम्ही मनापासून त्या मुक्या जीवावर प्रेम केलंत ना तर ‘सिखो ना नयनो की भाषा पिया’प्रमाणे तुम्ही सगळं आपसूक मनापासून कराल. पण फॅशन म्हणून पेट पाळलीत ना तर पैशानं त्याच्या सगळय़ा गरजा पुरवू शकाल, पण संस्कार नाही देऊ शकणार. त्याला श्रीमंत आयुष्य देण्यापेक्षा एक सुंदर आयुष्य द्या.






















































