
बिहारमध्ये इंडिया आघाडीची सत्ता आल्यास वक्फ (सुधारणा) कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ, अशी ग्वाही राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आज दिली. मुस्लिमबहुल किशनगंज, कटिहार आणि अरारिया जिह्यात घेतलेल्या जाहीर सभांमध्ये त्यांनी हा शब्द दिला. ‘लालूप्रसाद यादव यांनी जातीयवाद्यांशी कधीच तडजोड केली नाही. याउलट नितीश कुमार अशा लोकांना ताकद देत आहेत. त्यामुळेच भाजप आणि आरएसएस बिहार आणि देशांमध्ये धर्मांधतेचे विष पेरत आहे. भाजपा ही भारत जलाओ पार्टी आहे, असा घणाघात त्यांनी केला.
प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा
जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्यावरही तेजस्वी यांनी अप्रत्यक्ष टीका केली. ’काही लोक मते फोडण्यासाठी जबरदस्तीने उमेदवार उभे करत आहेत. मात्र, लोकांनी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. ही निवडणूक लोकशाही, संविधान आणि बंधुत्वाच्या संरक्षणाची लढाई आहे, असे ते म्हणाले.























































