
जगातील सर्वात मोठय़ा शीतपेय उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या रसना कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज पिरोजशॉ खंबाटा यांचे शनिवारी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सोमवारी रसना ग्रुपच्यावतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. त्यांच्या निधनाने उद्योग आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
महागडय़ा शीतपेयांना पर्याय म्हणून खंबाटा यांनी 1970 साली स्वस्तात मस्त रसनाची निर्मिती केली. एकेकाळी अवघ्या 5 रुपयांच्या पॅकेटमध्ये रसनाचे 32 ग्लास तयार व्हायचे. मेड इन इंडिया उत्पादन असलेले रसना हे शीतपेय अल्पावधीत लोकप्रिय ठरले. आज देशभरातील 18 लाख रिटेल दुकानदारांसह जगभरातील 60 देशांमध्ये रसनाची विक्री होते. अरिज खंबाटा बेनेव्होलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्ष होते. तसेच वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्तीचे माजी अध्यक्ष आणि अहमदाबाद पारसी पंचायतीचे अध्यक्षही राहिले होते.
























































