नाथपंथी डवरी गोसावी समाज युवा संघाने पुणे सोलापूर महामार्ग रोखला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भिगवण

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील भिक्षा मागण्यांस गेलेल्या पाच लोकांना मुले चोरणारी टोळी समजून जमावाने अमानुषपणे मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्यावतीने भिगवणमध्ये शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याने पुणे सोलापूर महामार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन केले.

मदनवाडी चौफुला येथून निघालेला मोर्चा तक्रारवाडीमार्गे भिगवणच्या मुख्य पेठेतून पुणे सोलापूर महामार्गावर आला. तेथे पोलिसांनी त्याना रोखल्यानंतर त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी समाजबांधवांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करून या घटनेत मयत झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना शासकीय मदत मिळावी, प्रत्येक वारसाला शासनाने नोकरी द्यावी व न्यायालयीन चौकशी करून आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या केल्या.

सदर मोर्चात भिगवण परिसरातील नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे अनेक युवक सहभागी झाले होते. यावेळी जि. प. सदस्य हनुमंत बंडगर, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, माजी सभापती रमेश जाधव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तेजस देवकाते, धनाजी थोरात, तुकाराम बंडगर, कुंडलिक बंडगर, इंदापूर तालुकाध्यक्ष संजय शिंदे, दिनेश शिंदे, भगवान शेगर, मोहन शेगर, रमेश आहेर, नवनाथ सावंत, विश्वनाथ आहेर, अर्जुन शिंदे, शरद चितारे आदी उपस्थित होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी लेखी मागण्यांचे निवेदन सहाय्यक पोलिस निरिक्षक निळकंठ राठोड यांना दिले. रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.