मराठा समाजाचे कर्जत चारफाटा येथे चक्काजाम

सामना प्रतिनिधी । कर्जत

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या उदात्त हेतूने आरक्षणाच्या लढाईत वीरमरण स्वीकारलेल्या काकासाहेब शिंदे या आमच्या समाज बांधवांचे बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही. यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात बंदची हाक दिली आहे. त्या प्रक्रियेत कर्जत सकल मराठा समाजाच्यावतीने कर्जत चारफाटा येथे बंदची हाक देऊन कर्जत चारफाट्यामध्ये हजारो मराठा समाजाच्यावतीने चक्काजाम करण्यात आले. आपल्या न्याय हक्कासाठी आणि सर्व मागण्यांसाठी  सकल मराठा समाजाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास साडेतीन तास हा चक्काजाम करण्यात आला.

कर्जतमधील सकल मराठ्यांनी कर्जतमध्ये बंदची हाक दिल्यानंतर हजारो मराठा बांधवांनी शिवाजी चौकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रँलीच्या माध्यमातून घोषणाबाजी देत कर्जत चारफाटा येथे चक्काजाम करण्यात आले.

कर्जत चारफाटा येथे सकल मराठा समाज बांधवांनी सुरु केलेल्या बंदमध्ये तरुणांसह  शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या समाज बांधवांबरोबर सहभाग घेऊन आपल्या न्यायहक्कासाठी जोरदार घोषणाबाजी दिल्या. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या मोठ्या बंदमधून तरुणांनी अँब्युलन्सला मार्ग देत मराठा समाजाचा आदर्श कायम ठेवला.

जवळजवळ साडेतीन तास शांततेच्या मार्गाने चाललेल्या बंदमध्ये  कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंधर नालकुल, कर्जतचे तहसिलदार अविनाश कोष्टी, कर्जत पोलीस  ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी उपस्थिती लावून सर्व मराठा बांधवांना बंद थांबविण्यासाठी आवाहन करण्यात आले. लगेचच एका शाळेय विद्यार्थ्याने मराठा समाजाच्यावतीने आपल्या मागण्या उपस्थित हजारो बांधवांसमोर वाचून दाखवला. नंतर संपूर्ण समाजाच्या वतीने काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून तहसिलदार अविनाश कोष्टी यांना निवेदन सादर केले.

या मोर्चा मध्ये जवळपास सर्वच पक्षामधील मराठा समाजच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता. शिवसेनेचे राजेश जाधव, रोहिदास मोरे, बालाजी विचारे, yamutaai विचारे, किसान शिंदे, राष्ट्रवादीचे राजेश लाड, राम राणे, अशोक सावंत, जगदीश ठाकरे आदी या मोर्चाला उपस्थित होते.