
रत्नागिरी तालुक्यात वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे.वाळू उत्खननाला बंदी असतानाही काळबादेवी किनाऱ्यावरील वाळूचे ढिगारे कुणाचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई करा अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून होत आहे.
शासनाने गेले वर्षभर वाळू उत्खननाला परवानगी दिलेली नाही.परवानगी नसताना दिवसाढवळ्या किनारपट्टीवर वाळू उपसा सुरू आहे.विशेष म्हणजे उपसलेल्या वाळूचे ढिगारे किनारपट्टीवर ठेवण्यात आले.हे ढिगारेही महसूल विभाग आणि खनिकर्म विभागाला दिसत नाहीत.बेकायदेशीर आणि बेसुमार वाळू उत्खननामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे.रत्नागिरी तालुक्यात काळबादेवी आणि आरे-वारे परिसरात बिनधास्त वाळू उपसा सुरू आहे.संगमेश्वर तालुक्यातही वाळू माफियांचे रॅकेट आहे.या वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.खनिकर्म विभागाने वाळू उत्खनन बंदीच्या काळात किती कारवाई केली हा संशोधनाचा विषय आहे.महसूल प्रशासनाने वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.



























































