
आज मी जयगड परिसरात जाऊन आलो तिथे जिंदाल कंपनीने सर्व पाणी प्रदुषित केले आहे. राख बसलेली आंब्याची पाने मी गोळा केली आहेत. जिंदाल कंपनीने तिथे गॅस टर्मिनल उभारायला एक कुदळ जरी मारली, तर आम्ही जिंदाल कंपनीवर कुदळ हाणू, असा रोखठोक इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला. ते आज (13 ऑक्टोबर 2025) रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात आयोजित हक्कयात्रेतील सभेत बोलत होते.
हक्कयात्रेत बच्चू कडू यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, मोदी आले तेव्हा वाटलं होतं काहीतरी चांगले होईल, मात्र काहीच चांगले झाले नाही. आज कोकणातील आंबा, काजू बागायतदार आणि मच्छीमार संकटात सापडले आहेत. कोकणातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यायला तयार नाही. मासेमारीला कृषीचा दर्जा दिला पण कृषीला कुठे दर्जा आहे? आधी कृषीला दर्जा मिळवून द्या. आधीच हे शेतकरी रडत आहेत त्यात मच्छीमारांना आणून बसवले आता तुम्ही दोघे बसा रडत असे मार्मिक उद्गार बच्चू कडू यांनी काढले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, प्रहार दिव्यांग संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षा काजल नाईक, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, आंबा बागायतदार संघटनेचे प्रकाश साळवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणाला गरीब ठेवायचं षडयंत्र
कोकणी माणूस गरीब आहे त्याला गरीब ठेवायचे षडयंत्र रचले जात आहे. कोकणी माणसाशिवाय मुंबई नाही. मुंबईत तुमचे राज्य पाहिजे. पण या लोकांनी कोकणी माणसाला गरीब ठेवले कारण भांडवलदारांना कमी पगारात मजूर मिळाला पाहिजे. या मुंबई-गोवा महामार्गाने सगळी सरकारं पाहिली मात्र महामार्ग काही पूर्ण होत नाही. रस्त्याचे काम रखडवून तुमच्या जमिनीचे भाव पाडायचे आणि कमी भावात जमिनी खरेदी करायच्या असा हा डाव आहे. तेव्हा पुढची पाच-दहा वर्ष तुमच्या जमिनी विकू नका मग पुढचा काळ आपलाच असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. पुढे बच्चू कडू म्हणाले की, अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधी हा दिव्यांगावर खर्च करायचा असतो. त्याहिशोबाने ३५ हजार कोटी रूपये दिव्यांगावर खर्च केले पाहिजेत पण सरकार १४ हजार कोटी रुपयेच खर्च करते. या विरोधातही आपल्याला लढत रहायचे आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
सिंधुदुर्गपासून पालघर पर्यंत मी स्वत: पदयात्रा काढणार आहे. कोकणातील आंबा, काजू आणि मच्छीमार यांच्या प्रश्नावर आवाज उठवणार आहे. या पदयात्रेत सामंताना भेटू, राणेंना भेटू, छोट्या राणेंना भेटू, त्यापेक्षाही छोट्या राणेंना भेटू असा टोला त्यांनी हाणला.