घरगुती वादातून सुनेने सासऱ्याच्या जेवणात विष घातले, पतीलाही बाधा; आरोपी महिला अटक

घरगुती वादातून सुनेने सासऱ्याच्या जेवणात विष घातल्याची घटना संगमेश्वरमध्ये घडली आहे. हेच विषारी अन्न पतीनेही सेवन केल्याने त्यालाही विषबाधा झाली. संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब रेवाळवाडी येथे मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी संबंधित सून स्वप्नाली सचिन सोलकर (32) हिला अटक केली आहे.

स्वप्नालीचा विवाह 13 एप्रिल 2025 रोजी सचिन सोलकर याच्याशी झाला होता. विवाहानंतर सासरच्या घरातील साफसफाई, कचरा काढणे यांसारखी कामे सासरे जगन्नाथ सोलकर हे स्वप्नालीकडून करून घेत असत. मात्र, स्वप्नानीला ही कामे करण्यास आवडत नसत. याचाच राग मनात धरून तिने सासऱ्याच्या जेवणात विष मिसळल्याची माहिती पती सचिन सोलकर यांनी पोलिसांना दिली.

विषारी अन्न खाल्ल्यानंतर सासरे आणि पती दोघांनाही उलट्या व मळमळीसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यांना तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृतीत सुधारणा होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झाले. देवरुख पोलीस स्थानकात 25 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी स्वप्नाली सोलकर हिला अटक करण्यात आली आहे.देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उदय झावरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.