उत्पादन शुल्क गाढ झोपेत! गोवा बनावटीच्या दारूचे रत्नागिरीत अड्डे, हेच महायुती सरकारच्या 100 दिवसांचे प्रगती पुस्तक

रत्नागिरी जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूचे अड्डे सुरू असून उत्पादन शुल्क विभाग मात्र गाढ झोपेत आहे. गोव्याची दारू रत्नागिरीत येऊन राज्य सरकारचा लाखो रूपयांचा कर बुडवला जात आहे. दुर्देव म्हणजे पालकमंत्र्याना बैठक घेऊन जिल्ह्यातील गोवा बनावटीच्या दारूचे अड्डे उद्ध्वस्त करा, असे सांगावे लागते हेच महायुती सरकारच्या 100 दिवसांचे प्रगती पुस्तक ठरले आहे.

राज्य सरकारचे भरमसाठ शुल्क भरून रत्नागिरी जिल्ह्यात अनेकांनी परमिट रूम, वॉईन शॉप सुरू केले आहेत. मात्र अनेक ठिकाणी गोवा बनावटीची दारू विकली जात असल्याने राज्य सरकारचा कर भरणारे परमिट रूमधारक आणि वॉईन शॉप व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडत आहेत. परमिट रूम आणि वॉईन शॉप व्यवसायिकांनी रत्नागिरीत विक्री सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या दारूबाबत आवाज उठवला तरी महायुती सत्तेवर आल्यानंतर 100 दिवसाच्या काळात तो उत्पादन शुल्क विभागाच्या कानात शिरला नव्हता. आज अखेर महायुतीच्या 100 दिवसांच्या प्रगती पुस्तकावर लाल शेरा ओढावा, अशी घटना रत्नागिरीत घडली. उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन उत्पादन शुल्क विभागाला ऐन गटारीच्या तोंडावर झोपेतून उठवावं लागले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी उत्पादन शुल्क विभागाला जिल्ह्यातील गोवा बनावटीचे अड्डे उध्वस्त करा, गोवा बनावटीची दारू जिल्ह्यात येण्यापासून रोखा आणि भरारी पथकाने धाडी घालाव्यात असे सांगून उत्पादन शुल्क विभागाची ‘पाठशाळा’ घेतली.

उत्पादन शुल्क आता तरी जागे होणार का?

रत्नागिरी जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई करा असे सांगायची वेळ पालकमंत्र्यावर आल्यानंतर तरी उत्पादन शुल्क विभाग जागा होणार का? रत्नागिरी तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाया थंडावल्या असून रत्नागिरी विभाग सांभाळणारे अधिकारी आणि कर्मचारी करतात काय? असा सवाल नागरिकांना पडला आहे. रत्नागिरी विभागातील अधिकाऱ्यांनी हातभट्टी वर किती कारवाया केल्या हा संशोधनाचा भाग आहे.हातभट्टीच्या दारूचा वास या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याची मार्मिक चर्चा ग्रामस्थ करतात.