
दापोलीतील आंजर्लेहून मुंबईकडे चाललेल्या एसटीला मंडणगड तालुक्यात अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली. या अपघातात चालक-वाहकासह दोन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथून मुंबईतील परळ येथे एसटी चालली होती. यादरम्यान दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास आंजर्ले ते मंडणगड पालवणी मार्गावर नारगोली घाटाच्या तीव्र उतारात ब्रेक निकामी झाल्याने एसटी रस्त्या सोडून खाली झुडपात घुसली. या अपघातात चौघे जखमी झाले. विनोद पांडुरंग सोनावणे, कृष्णा देविदास चाटे, गजानन दामोदर चौगुले आणि शेखर दत्तात्रय चव्हाण अशी जखमींची नावे आहेत.
अपघाताची माहिती मिळताच मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे हे आपल्या पोलीस सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना तात्काळ मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची मंडणगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास हा पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास मांडवकर हे करीत आहेत.


























































