
गेले अनेक वर्षे लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या पनवेल कन्याकुमारी एनएच 66 या दुपदरी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत, अनेक ठिकाणी काँक्रिटमधल्या शिगा बाहेर आल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खडबडीत झाला आहे. गतिमान विकासाची स्वप्ने दाखवणाऱ्या केंद्र सरकारचे या महामार्गाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.
संथगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे होणारी वाहतूककोंडी, चिपळूणमध्ये सुरु असलेले उड्डाणपुलाचे काम, पूल दुर्घटना या साऱ्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्यांच्या कामांमुळे सतत अपघाताच्या घटना घडत असतात. याकडे केंद्र सरकार डोळेझाक करत असल्याची टीका जनतेतून होत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आरवलीपासून चिपळूणपर्यंत रस्त्यांना अनेक भेगा पडल्या असून काँक्रिटमधील शिगा बाहेर आल्या आहेत. खेरशेत येथे रस्ता उखडला आहे. कामथे घाटात मोठ्या भेगा व खड्डे पडले आहेत. असुर्डे येथे खड्डे तर असुर्डे खिंडीच्या पलीकडे चिपळूणकडे जाताना शिगाच रस्त्यावर आल्या आहेत. रस्त्याचा पृष्ठभाग देखील खाली-वर असल्यामुळे गाडी चालवताना त्रास होत आहे. या एकूणच भीषण परिस्थिकडे केंद्र व राज्य शासन लक्ष देणार का हाच प्रश्न आहे.




























































