
कधी बेभरवशी पाऊस तर कधी वन्य प्राण्यांचा उपद्रव त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्याने कोकणातील बहुतांश शेतकरी पूर्वीसारखे भात आणि नाचणी पिक आता घेत नाहीत. मात्र काहीजण हे आपली वडिलोपार्जित शेती ओसाड पडू नये म्हणून हातावर मोजण्याइतपत शेतकरी त्यातूनच भात शेती आणि नाचणी पीक घेतात. अशाच काही दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी देखील भातशेतीसह नाचणीची लावणी केली होती. पीक हातातोंडाशी आलेले असताना निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हातून निसटले आहे.
दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गुंठ्यांतील शेती त्यात कुणी भाताची लावणी केली होती तर कुणी नाचणी, वरी पिकाची लावणी केली होती. यावर्षीचा खरीप हंगाम सुरू होण्याआधीच यावेळी ११ मे पासूनच मोसमी पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात सुरू झालेल्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केल्याने अनेकांच्या भात नाचणी पिकांच्या पेरण्या रखडल्या होत्या. त्याला हार न मानता शेतकऱ्यांनी डोंगर उतारावर नाचणीची पेरणी करून रोप तयार केले. शेतकऱ्यांनी केलेल्या अतोनात मेहनतीमुळे शेती देखील चांगलीच तरारली होती. भात पिकासह नाचणी पीक परिपक्व झाल्याने ते कापण्यायोग्य झालेले असतानाच लहरी हवामानाचा प्रकोप झाला आणि निसर्गचक्र बदलून पावसाची जोरदार बरसात झाली. त्यात कापण्याजोगे तयार झालेली भातशेती पुर्णतः भातशेतीच्या चोंढयातच आडवी झाली. भिजलेल्या भाताचा पेंढा गुरे तोंडात घेत नाहीत त्यामुळे गुरांच्या वैरणीचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होणार अशा या संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने पंचनामे करावेत पण पंचनामे करताना त्यांनी सातबारा उतारे न बघता जिथे ज्या ठिकाणी ज्या कुणी शेती पिक घेतले आहे त्याची खातरजमा करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.






























































