
झेंडूची फुलं म्हटली की, दसऱ्याचा सण डोळ्यांसमोर उभा राहतो. या काळात झेंडूला मोठी मागणी असली तरी अनेकदा शेतकऱ्यांना मातीमोल भावातच फुलांची विक्री करावी लागते. मात्र झेंडूची शेती केवळ दसऱ्यापूर्ती मर्यादित नसून वर्षभर योग्य नियोजन केल्यास ती लाखोंचे उत्पन्न देणारी ठरू शकते, हे संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावचा कृषी पदवीधर तरुण शेतकरी शुभम दोरकडे यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावचे शुभम दोरकडे यांनी झेंडू फुलशेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत या पिकातून भरघोस उत्पन्न मिळवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. महामार्गालगत असलेल्या त्यांच्या शेतीपैकी सुमारे एक एकर क्षेत्रावर त्यांनी झेंडूची लागवड केली असून, त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. नैसर्गिक आपत्ती, बाजारातील पिळवणूक आणि वाढती खर्चवाढ यामुळे शेतीपासून दूर जात असलेल्या तरुणांसाठी शुभम यांची ही यशोगाथा निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
शुभम दोरकडे हे कृषी शिक्षण घेतलेले तरुण शेतकरी असून, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीऐवजी शेतीलाच आपलं करिअर बनवण्याचा त्यांनी ठाम निर्णय घेतला. सुरुवातीला तीन एकर शेतीमध्ये त्यांनी विविध पारंपरिक पिकांचे प्रयोग केले. मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांनी झेंडू फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांपासून ते झेंडूची लागवड करत असून, यावर्षी एक एकर क्षेत्रावर घेतलेल्या झेंडू पिकातून त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय गट शेतीच्या माध्यमातून परिसरातील इतर शेतकरीही अशा प्रकारची फुलशेती करत असल्याची माहिती शुभम दोरकडे यांनी दिली. योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक शेतीदृष्टीकोन असला तर झेंडूसारखी फुलशेतीही शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीचा मार्ग ठरू शकते, हेच या यशोगाथेतून अधोरेखित होते.





























































