
खरेदी केलेल्या 10 गुंठे बिनशेती जमीन खरेदीनंतर नाव दाखल केलेला सातबारा आणि फेरफार उताऱ्याची प्रत देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागताना चाफे येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय – 51) असा तलाठ्याचे नाव आहे
तक्रारदार याने रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथे 10 गुंठे बिनशेती जमीन खरेदी केली होती. या खरेदीची नोंद साताबारा वर व फेरफार होण्यासाठी चाफे येथील तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज केला होता. सातबारा उतारा आणि फेरफारची प्रत देण्यासाठी तलाठी बजरंग दत्तात्रय चव्हाण याने तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली.
त्यानंतर तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 10 हजार रुपयांची लाच घेताना तलाठी बजरंग चव्हाण याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, उदय चांदणे, दीपक आंबेकर, श्रेया विचारे, हेमंत पवार, समिता क्षीरसागर, वैशाली धनवडे यांनी केली.
































































