17 लाखांचा मुद्देमाल लंपास करणारे चोरटे 24 तासांत जेरबंद, रत्नागिरी पोलिसांची कारवाई

566

रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथील अष्टविनायक संकुलात एका युवकाच्या तोंडाला चिकटपट्‌टी चिकटवून त्याला दोरीने बांधून ठेवत चोरट्यांनी 17 लाख 71 हजार रुपये किंमतीचे लॅपटॉप, मॉनिटर, हेडफोन, डिव्हीआर चोरुन पोबारा केला होता. जबरी चोरी करणार्‍या या चोरट्यांना रत्नागिरी पोलीसांनी 24 तासात सांगली येथून अटक केली आहे.

16 फेब्रूवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता अष्टविनायक संकुल येथील फ्लॅट नंबर 1 मध्ये व्यंकटेशा नावाच्या कॉम्प्युटर विक्रीच्या दुकानात चोरट्यांनी हा डल्ला मारला. दुकानातील नोकर संकेत राजेंद्र चव्हाण, (वय 21, मूळ रा. वाळवा सांगली) हे एकटेच असताना फ्लॅटचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. चव्हाण यांनी दरवाजा उघडला असता तीन अनोळखी व्यक्तींनी आपल्याला लॅपटॉप खरेदी करायचा असून फलॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संकेत चव्हाण याला चाकूचा धाक दाखवत त्याच्या तोंडाला चिकटपट्‌टी लावून दोरीने त्याला खुर्चीत बांधून ठेवले. त्यानंतर चोरट्यांनी 49 लॅपटॉप, 11 मॉनिटर, 3 हेडफोन चोरुन नेले.

गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरिक्षक शिरीष सासने, रत्नागिरी शहर पोलीस निरिक्षक सअनिल लाड, ग्रामीण पोलीस निरिक्षक सुरेश कदम यांची विविध पथके तयार करुन चोरट्यांचा शोध सुरू झाला. पोलीस निरिक्षक अनिल लाड यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथकाने पुरावे, आरोपींचे वर्णन आणि गोपनीय माहितीच्या आधारे सांगली येथील तीन चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यामध्ये महेश रामचंद्र चौगुले, (रा. सांगलवाडी, सांगली), सुरज सदाशिव निकम (वय 25, कदमवाडी रोड सांगली), सुनिल चंद्रकांत घोरपडे (वय 30, रा कर्नाळा, नांदेरे रोड, सांगली), रेवणसिंधू हनुमंत बगले (वय 19, रा. सांगलवाडी, सांगली) या चौघांना ताब्यात घेऊन 14 लाख 23 हजार 163 रुपये किंमतीचे 36 लॅपटॉप, 58 हजार 208 रुपये किंमतीचे 11 मॉनिटर, 2 हजार रुपये किंमतीचा हेडफोन, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि चारचाकी (गाडी क्र. एमएच के 12 एफके 6050) असा 19 लाख 83 हजार 406 रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

मास्टर माईंडने तिघांना कामगिरीवर पाठवले
या संपूर्ण चोरी प्रकरणातील म्होरक्या महेश रामचंद्र चौगुले याने या संपूर्ण चोरीचा कट रचून उर्वरित तिघांना कामगिरीसाठी रत्नागिरीत पाठवले आणि तो सांगलीत थांबला. पोलिसांनी म्होरक्यासह तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून आणखी दोन आरोपी असल्याचे निष्पन्न होत आहे. त्यांनाही लवकरच अटक होईल असा विश्वास अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या