
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
गणपती उत्सवाच्या दरम्यान चिपळूण, संगमेश्वर व खेड परिसरात झालेल्या चोरीचा तपास करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पुण्यात दोन आरोपींना अटक केली. अशाच प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर यापूर्वी दाखल झालेले होते. त्या दोघांवर वीस गुन्हे दाखल असल्याची माहिती रत्नागिरी पोलीसांनी दिली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने भोर व भाटघर या ठिकाणी संशयित आरोपी शोभा उर्फ मंगला अंकुश साठे उर्फ लता पोपट कांबळे (60) गणेश पोपट कांबळे (34) दोन्ही रा.भाटघर ता. खंडाळा जि. सातारा यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी दापोली एस.टी.स्टँड या ठिकाणी गर्दीचा फायदा घेवून केलेल्या चोरीची कबुली दिली.
रायगड व रत्नागिरी जिल्हयामध्ये बरेच गुन्हे केल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न होत आहे. आरोपींकडून एकुण 12,600/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींवर एकुण 20 गुन्हे पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्हयांमध्ये दाखल आहेत. दोन्ही आरोपींकडून रत्नागिरी जिल्हयामध्ये अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी व दापोली पोलीस ठाण्यातून तपास सुरु आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, स. पो. फौ. पांडुंरग गोरे, पो. हे. कॉ. संजय कांबळे, विजय आंबेकर, सत्यजित दरेकर, रमिज शेख, चालक दत्ता कांबळे यांनी केलेली आहे.
































































