रत्नागिरीत दिवसभर पावसाच्या सरी, गेल्या 24 तासात 149 मिमी पावसाची नोंद

पाऊस लांबल्याने कडक उन्हाळ्याने नागरिक हैराण झाले होते. दुसरीकडे भीषण पाणीटंचाईचे संकट भेडसावत असताना बळीराजा पेरणीसाठी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. अशावेळी शनिवारी पहाटेपासून मान्सून रत्नागिरीत दाखल झाला. दिवसभर ढगाळ वातावरणात पावसाच्या सरी कोसळत होत्या.

‘बिपरजॉय’ वादळामुळे पाऊस लांबला होता. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता, तर पाणीटंचाई रौद्ररूप धारण करत होती. अखेर हवामान खात्याने 23 जून पासून पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. अखेर शनिवारी पहाटे पासून मान्सून सक्रीय झाला. जोरदार पाऊस सुरू होताच अनेक जणांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला.

सकाळपासून पडलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते.दिवसभर ढगाळ वातावरणासह पाऊस पडत होता. शुक्रवारी जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 149 मिमी पावसाची नोंद झाली.