रत्नागिरीत धक्कादायक प्रकार, शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची माथेफिरूकडून तोडफोड

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना ताजी असतानाच रत्नागिरीतील मारुतीमंदिर येथील शिवसृष्टीमध्ये एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोड करुन विटंबना केली आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मारुतीमंदिर येथे शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. या शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्याचे एका व्यक्तीने नुकसान केल्याचे समोर आले आहे. तो व्यक्ती मारुतीमंदिर येथून एसटी स्टॅण्डच्या दिशेने पळून गेला. त्या घटनेचे गांभिर्य ओळखून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांच्या मदतीने आठवडाबाजार येथून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव संदेश गावडे, (24) असे आहे. त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा आरोपी रत्नागिरी शहरातील रहिवाशी असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे. रत्नागिरी पोलीस दलाने नागरीकांना आवाहन केले आहे की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवांचे बळी होऊ नये.

शिवसैनिकांनी केली पाहणी

शिवसृष्टी येथील मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोड झाल्याची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी जाऊन घडलेल्या प्रकाराची पाहणी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना रत्नागिरी शहरात घडू नयेत. युगपुरुषांच्या पुतळ्यांचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी सीसीटीव्ही चालू स्थितीत असावेत अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, बावा चव्हाण, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, महिला शहर संघटक मनिषा बामणे, माजी नगरसेवक सलील डाफळे, राजश्री शिवलकर, विजया घुडे, सेजल बोराटे, राजश्री लोटणकर उपस्थित होते.