बाहेरून टीका करणं सोपं, रवी शास्त्री यांचे चोख उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मेलर्बन 

पर्थ कसोटीत पराभूत झाल्यानंतर टीम इंडियावर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली. माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी तर संघनिवडीवरून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली यांनाच टार्गेट केले. यावर रवी शास्त्री यांनी रविवारी उत्तर देताना म्हटले की, दूरवर बसून टीका करणे सोपे असते. आम्हाला प्रत्यक्षात मैदानात सर्वोत्तम खेळ करण्यासाठी योजना आखावी लागते. या दरम्यान संघाच्या हितासाठीचेच निर्णय घेतले जातात. ही एक सामान्य बाब आहे.

बहुचर्चित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी क्रिकेट मालिकेत ‘टीम इंडिया’ला फलंदाजीतील अपयशाचा प्रश्न सतावतोय. सलामीच्या जोडीचा फ्लॉप शो संघासाठी चिंतेचा विषय असल्याची कबुली हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही दिली आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत उभय संघ सध्या 1-1 असे बरोबरीत असून तिसरी कसोटी बुधवारपासून मेलबर्नमध्ये सुरू होणार आहे.

रोहितचे पुनरागमन की मयांकला संधी
मयांक अग्रवालबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले, हा प्रतिभावान फलंदाज असून हिंदुस्थान ‘अ’ संघाकडून मयांकने सातत्यपूर्ण कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. स्थानिक क्रिकेटमध्येही त्याने चमकदार खेळ केलेला आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याच्याबाबत काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. याचबरोबर रोहित शर्माही पाठीच्या दुखापतीतून सावरला असून त्यालाही मेलबर्न कसोटीत पुनरागमनाची संधी मिळू शकते असेही शास्त्री यांनी सांगितले. प्रशिक्षकांच्या या वक्तव्यामुळे मुरली विजय किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी किमान एकाला संघाबाहेर बसावे लागेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

जाडेजा फिट
रणजी सामना खेळत असतानाच रवींद्र जाडेजाच्या खांद्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी जाडेजाने चार इंजेक्शन घेतली होती, मात्र त्याची ही दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झाली नसल्याचे शास्त्रींनी सांगितले. पर्थ कसोटीसाठी जाडेजाचा 13 जणांच्या संघात समावेशही करण्यात आला होता, परंतु दुखापतीमुळे त्याचा अंतिम 11 जणांच्या संघात विचार झाला नाही. मात्र बीसीसीआयकडून रवींद्र जाडेजा फिट असल्याचे सांगण्यात आले. तसेच चौथ्या कसोटीसाठी त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो, असेही सांगण्यात आले.