
यूट्युबर ज्योती मल्होत्राचे हेरगिरी प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या इंजिनीयर रवी वर्माला कळव्यातून अटक केल्याने एकच खळबळ उडाली. त्याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. रवी वर्माने आतापर्यंत 14 पाणबुड्या आणि युद्ध नौकांची माहिती पाकिस्तानला पाठवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
रवी वर्मा हा कळव्यात शिवशक्तीनगर येथे आईसह राहतो. तो जन्मापासून कळव्याचा रहिवासी आहे. रवी वर्मा नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनीयर म्हणून काम करत होता. ज्या पाणबुड्या आणि युद्ध नौकांमध्ये तो काम करायचा त्याची सर्व माहिती त्याने पाकिस्तानला पुरवल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. त्यात पाणबुड्या आणि युद्ध नौकांचे नकाशे, शस्त्रसाठा ठेवण्याचे ठिकाण तसेच गोपनीय स्थळांची माहिती त्याने पाकिस्तानला दिली.
मोबाईल वापरण्याची परवानगी नसल्याने सर्व माहिती लक्षात ठेवून ऑडिओ क्लिप आणि चित्रे बनवली नेव्हल डॉकमध्ये मोबाईल वापरण्याची परवानगी नाही. त्यामुळे रवी वर्मा याने पाणबुड्या, युद्ध नौकांचे नकाशे आणि शस्त्रागार याची सर्व माहिती लक्षात ठेवून ऑडिओ आणि टेक्स्ट स्वरूपात तसेच चित्र काढून पाकिस्तानशी संबंधित असलेल्या हनी ट्रॅप लावलेल्या महिलेच्या फेसबुक आणि मोबाईलवर पाठवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. रवी वर्माची चौकशी सुरू असून त्याने आणखी कोणती गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली. तसेच या हेरगिरीत त्याचा कोणी साथीदार आहे का याचा तपास सुरू आहे.
‘पायल शर्मा’ आणि इस्प्रीतशी चॅटिंग
इंजिनीयर रवी वर्माला पायल शर्मा नामक महिलेने फेसबुक अकाऊंटवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर तिने अत्यंत अश्लील फोटो वर्माला पाठवले. पाकिस्तानी एजंट असलेल्या पायलने रवी वर्माला प्रेमाच्या जाळ्यात पुरते अडकवले. ती सांगेल तसे तो वागत होता. संरक्षण दलावर मी प्रोजेक्ट करत आहे. तू त्याच खात्यात काम करतोस. मला त्याची माहिती दे. तू चांगली माहिती दिलीस तर तुझ्या पायलच्या प्रोजेक्टला चांगले मार्क मिळतील असे सांगून तिने भावनिक जाळे टाकले. त्यानंतर हिंदुस्थानी पाणबुड्या, युद्ध नौका तसेच इतर जहाजांची संवेदनशील माहिती फेसबुकवरून पायलला पाठवली. वर्मा हा पायल शर्मा आणि इस्प्रीत अशा दोन फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हे दोन्ही फेसबुक अकाऊंट बनावट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या अकाऊंटवरून पाकिस्तानी एजंटनी आणखी कोणाला जाळ्यात अडकवले आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. ही माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्यांचा आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय पोलिसांना आहे.