
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. एक्स नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे कंपनीने त्यांचे अकाऊंट सस्पेंड केल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान, भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची जुलै महिन्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक किरेन रिजिजू यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत वरळीमध्ये झालेल्या भाजपच्या राज्य अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करून तसे प्रमाणपत्र त्यांना दिले.
रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते 2007 मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2009 पासून ते सलग चारवेळा विधानसभेवर निवडून येत आहेत. 2014 मध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. 2022 मध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी होती. पालघर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला आहे.