
तत्कालीन भाजप सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह विभागही होता. त्यावेळी महिलांवरील अत्याचार, विनयभंग व दंगलीसारख्या घटनेत 19 टक्क्यांनी वाढ झाली होती, अशा शब्दांत शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत विरोधी पक्षावर जोरदार टीका केली.
विरोधी पक्षाच्या नियम 293च्या प्रस्तावावर रवींद्र वायकर यांनी गुन्हेगारी, पोलिस वसाहती, शक्ती कायदा, धारावी पुनर्विकास अशा विविध विषयांवर मत मांडले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱया पोलिसांच्या वसाहतींची अवस्था अतिशय दयनीय आहे. काही वसाहती या धोकादायक अवस्थेत आहेत. पोलिसांच्या घरकुलाचा प्रलंबित प्रश्न सोडविणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
पोलिसांच्या वसाहतींचा पुनर्विकास करताना 4 एफएसआय दिला तर या वसाहतींचा पुनर्विकासही होईल. पोलिसांकडून बांधकाम शुल्क घेतल्यास पोलीस दलात 30 वर्षांपेक्षा जास्त सेवा करणाऱया पोलिसांचा घरकुलाचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल अशी सूचना त्यांनी केली.
धारावी पुनर्विकास प्रलंबित
गेली अनेक वर्षे धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न रेंगाळत आहे. याचा पुनर्विकास करण्यासाठी सहा सनदी अधिकाऱयांची समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र अद्यापही धारावीचा पुनर्विकास करण्यात आलेला नाही. यासाठी निधीची तरतूदही केली होती. त्यामुळे धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता वायकर यांनी व्यक्त केली.
केंद्राकडे प्रयत्न
माहुल येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी आवश्यक असलेली केंद्राच्या अखत्यारीतील सहा एकर जागा महापालिकेला मिळवून देण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केली.






























































