
नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने 5 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, तसेच 7 दिवसांच्या आत शेतीचे पंचनामे करुन तसा अहवाल शासनाला सादर करावा असे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी प्रशासनाला दिले. नुकत्याच झालेल्या शेती नुकसानीचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री अमरावती विभागात आले होते. त्यांनी बुलडाणा, अकोला, अमरावती सह पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रशासनाला आदेश दिले. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
अमरावती महसूल विभागाचा दौरा आटोपल्यानंतर शनिवारी सायंकाळी दिवाकर रावते अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यांनी पाचही जिल्ह्यांची माहिती उपस्थित अधिकार्यांना दिली. 50 वर्षात एवढा पाऊस झाला नाही. पीक घरात येतानाच अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तोंडात आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. अशा स्थितीत सरकार कधी बसेल याचा विचार न करता शेतकर्यांचे अश्रू पुसून त्यांना आधार देणे हे पहिले कर्तव्य असल्याचे रावते म्हणाले. म्हणूनच तातडीची मदत म्हणून प्रथम प्रत्येक शेतकर्याला 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. यासोबतच शेतीच्या नुकसानीचा आढावा 7 दिवसात तयार करुन तसे पंचनामे सादर करावे असे निर्देश देण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले. विशेष म्हणजे कृषी अधिकार्यांनी पीक विम्याची पोच संबंधित शेतकर्यांना द्यावी, तसेच विमा कंपन्यांनीही पिक विमा देताना हयगय करु नये. अमरावती जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे 4 लाख शेतकर्यांचे नुकसान झाले असून विभागात हा आकडा 16 लाख असल्याचे रावते यांनी सांगितले. परतीच्या पावसामुळे 80 टक्के पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, असेही रावते यांनी यावेळी सांगून पश्चिम विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा, असे त्यांनी मुंबई येथे झालेल्या उपसमितीच्या बैठकीत सांगितल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.




























































