
रिझर्व्ह बँकेकडून ‘पीएमसी’ आणि ‘लक्ष्मीविलास’ बँकेवर निर्बंध लादण्यात आल्यानंतर विविध कॉर्पोरेटिव्ह आणि शेड्यूल बँकांमध्ये खाते असलेल्या खातेधारकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. अनेक खातेधारकांनी बँकेतून आपले पैसे काढून घेण्यास सुरूवात केली आहे. तसेच अनेक ठिकाणी बँकिंग यंत्रणेबाबत अफवा पसरवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने मंगळवारी ट्वीट करून खातेधारकांना दिलासा दिला आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन आरबीआयने ट्वीटद्वारे करण्यात आले आहे. बँकिंग यंत्रणा सक्षम असून चिंतेचे कारण नाही, खातेधारकांचे पैसे बँकांकडे सुरक्षित असल्याचेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
Reserve Bank of India: There are rumours in some locations about certain banks including cooperative banks,resulting in anxiety among depositors. RBI would like to assure the
public that Indian banking system is safe&stable&there is no need to panic on the basis of such rumours. pic.twitter.com/ucrqOba2Lb— ANI (@ANI) October 1, 2019
रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खातेदार त्यांच्या खात्यातून फक्त 10 हजारापर्यंतची रक्कम काढू शकतात. त्यामुळे आमच्या खात्यातील आमचेच पैसे काढण्यावर बंधने आल्याने खातेधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेव्टिव्ह आणि शेड्यूल बँकाबाबतच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. त्यामुळे आपले पैसे वाचवण्यासाठी खातेधारकांनी मोठ्या प्रमाणात बँकेतून पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. रिझर्व्ह बँकेने ट्विट करत खातेधारकांनी घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तसेच बँकिंग यंत्रणा सक्षम असून खातेधारकांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे. खातेधारकांना त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँक हे सुरक्षित माध्यम असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या या ट्विटनंतर अनेकांनी या परिस्थितीला रिझर्व्ह बँकच कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. बँकांवर निर्बंध घातल्याने खातेदार त्यांचे पैसे काढू शकत नाही. बँकेतील पैशांवरच आमचे दैनंदिन व्यवहार चालतात. आता व्यवहार कसे करायचे असा संतप्त सवालही विचारण्यात आला आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने ट्विट करत बँकिंग यंत्रणा सक्षम असल्याची आणि खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिल्याने खातेधारकांमधील घबराट कमी झाली आहे.

























































