
>> प्रसाद ताम्हनकर
जगभरातील प्रेक्षकांच्या मनात ‘रिऑलिटी शो’चे एक वेगळे स्थान आहे. करोडो प्रेक्षक या ‘रिऑलिटी शो’चे दिवाने आहेत. हे ‘रिऑलिटी शो’देखील सतत काहीतरी नावीन्यपूर्ण मनोरंजन देण्याचा प्रयत्न करत असतात. आता परदेशातील दोन ‘रिऑलिटी शो’ चक्क आपल्या स्पर्धकांना अंतराळवारी करवण्याचा विचार तर करत आहेतच, पण जोडीला चक्क ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’मध्ये शूटिंगसाठी सेट उभारण्याचादेखील विचार करत आहेत.
जगातील काही प्रमुख अब्जोपतींनी नुकतीच खासगी अंतराळवारी पूर्ण केली. त्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष या क्षेत्राकडे वळले. काही खासगी कंपन्यांमध्ये खासगी अंतराळयात्रा सुरू करण्याची जोरदार स्पर्धा सुरू आहे, त्यात या श्रीमंत मंडळींच्या यात्रेने आणखी भर घातली आहे. सध्या चर्चेत असलेल्या अशा ‘हॉट टॉपिक’कडे ‘रिऑलिटी शो’वाल्यांचे लक्ष वेधले गेले नसते तरच नवल! जगप्रसिद्ध डिस्कव्हरी चॅनेल ‘हू वॉन्टस् टू बी अ ऍस्ट्रोनॉट’ नावाचा ‘रिऑलिटी शो’ सुरू करण्याच्या विचारात असून त्याची प्रतिस्पर्धी कंपनी ‘स्पेस हिरो’सुद्धा ‘स्पेस हिरो’ या नावानेच ‘रिऑलिटी शो’ सुरू करण्याच्या तयारीत आहे. याचाच अर्थ आता तुम्हाला एखाद्या स्पेस एजन्सीच्या मदतीशिवाय आणि कुठलीही विशेष डिग्री प्राप्त न करतादेखील अंतराळयात्री बनण्याची संधी मिळणार आहे.
या शोमध्ये भाग घेऊन विजयी झालेल्या स्पर्धकांना अंतराळ प्रवासाची संधी तर मिळणार आहेच, पण त्या जोडीला लाखो डॉलर्सचे बक्षीस कमावण्याचीदेखील संधी मिळणार आहे. नेहमीच्या ‘रिऑलिटी शो’प्रमाणे या ‘स्पेस शो’चादेखील फॉर्मेट असणार आहे. कोणत्याही देशाचे स्पर्धक यात भाग घेऊ शकणार आहेत. या शोसाठी अंतराळ आणि अंतराळ प्रवासातील अडचणींचा पूर्ण विचार करून ‘शो’ची आखणी केली जाणार आहे. त्यामुळे अंतराळ प्रवासी बनू शकतील अशा सक्षम आणि प्रतिभावान स्पर्धकांची निवड करण्याचे प्रमुख आव्हानदेखील या टीव्ही चॅनेल्ससमोर असणार आहे. डिस्कव्हरी चॅनेल यासाठी ह्युस्टन येथे स्थित असलेल्या ‘एक्सियम स्पेस’ या अंतराळ ब्रोकरची सेवा घेणार असून नासाच्या अंतराळ मोहिमेत पूर्वी सहभागी असलेल्या ‘माईक मासिमिनो’ या अंतराळयात्रीचादेखील सल्ला आणि मदत घेतली जाणार आहे. ‘माईक मासिमानो’ 2009 साली ‘हबल टेलिस्कोप’च्या दुरुस्तीसाठी आखण्यात आलेल्या अंतराळ मोहिमेत सहभागी झाला होता. ‘नासा’ने मात्र यासंदर्भात अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
भविष्यात अशा विविध शोमधून अंतराळवीराचे कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेतलेले अंतराळवीर तयार होतील आणि त्यांच्याकडून अधिक चांगले मनोरंजन आणि उत्कृष्ट चित्रपटांची अपेक्षा आपण करू शकू अशी आशा माईकने व्यक्त केली आहे. अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’वर अशा प्रकारच्या ‘शो’चे चित्रीकरण करणे अत्यंत अवघड असणार आहे. शूटिंगसाठी लागणाऱया मोठमोठय़ा कॅमेऱयांचा विचार हे अंतराळ स्थानक बांधताना करण्यात आलेला नाही. तसेच या स्थानकाचा एकूण आकार आणि पसारा बघता अत्यंत सावधपणे आणि मोजक्याच लोकांना घेऊन येथे काम करावे लागणार आहे
‘हू वॉन्टस् टू बी अ ऍस्ट्रोनॉट’ हा पूर्णपणे अमेरिकन शो असणार आहे. मात्र ‘स्पेस हिरो’चे निर्माते जगभरातील स्पर्धकांना यात समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत. या शोमध्ये जगभरातील एकूण 24 स्पर्धकांची निवड करण्यात येईल. यात 12 महिला व 12 पुरुषांना संधी मिळेल, तर एकूण 24 स्पर्धकांपैकी 12 स्पर्धक हे विकसित देशातील असतील, तर 12 स्पर्धक विकसनशील देशांतील असणार आहेत. या स्पर्धकांना ‘बिग बॉस’च्या धर्तीवरच एका खास बनवलेल्या ‘स्पेस व्हिलेज’मध्ये ठेवण्यात येईल. विशेष प्रकारचे अंतराळ सूट आणि बायोमॅट्रिक चाचण्यांच्या मदतीने हे स्पर्धक इथे आपला काळ व्यतीत करतील. ‘स्पेस हाऊस’मधील कामगिरी आणि विविध स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारावर दर आठवडय़ाला एका स्पर्धकाला या स्पर्धेतून बाहेर काढले जाईल. जगभरातील स्पर्धक आपल्या आवडत्या अंतराळवीरासाठी मतदान करू शकणार आहेत.
























































