
सामना ऑनलाईन, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी QRT म्हणजेच शीघ्रकृती दलाच्या जवानांना नेणारे खासगी वाहन उडवून दिले. या हल्ल्यामध्ये 15 जवान शहीद झाले असून एक वाहनचालकही मृत्यूमुख पडला आहे. या जवानांच्या येण्याची नक्षलवाद्यांना खबर लागू नये यासाठी हे खासगी वाहन वापरण्यात आले असावे असा अंदाज आहे, तरीही नक्षलवाद्यांनी या वाहनाला आपले लक्ष्य बनवले. जवानांच्या हालचालीसंदर्भातील गुप्त माहिती कोणीतही फोडल्याने हा हल्ला झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कुरखेडा भागामध्ये मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामासाठी आलेल्या जेसीबी, ट्रक आणि अन्य गाड्या तसेच वाहनांची जाळपोळ केली होती. या भागाची पाहणी करण्यासाठी 25 जवान घटनास्थळी निघाले होते. या मार्गावरच त्यांचे वाहन उडवून देण्यात आले. गडचिरोलीमधील लोकल एरिया कमिटीने हा हल्ला घडवून आणला असून या हल्ल्यासाठी IED स्फोटकांचा वापर केला असण्याची दाट शक्यता आहे.
25 एप्रिल 2018 रोजी पोलिसांनी आणि सशस्त्र दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात एक मोठी कारवाई केली होती. अनेक तास चाललेल्या या कारवाईत 40 नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले होते. या चकमकीला वर्ष पूर्ण होत आलं असून त्याचा बदला घेण्यासाठीही कदाचित हा हल्ला केला असावा असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता, या हल्ल्याची सूत्रधार रामको नरोटी होती. याच रामको नरोटीसोबत दुसरी एक महिला नक्षलवादी शिल्पा ध्रुवा यांना 27 एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कुंडूरवाही परिसरात झालेल्या चकमकीमध्ये कंठस्नान घालण्यात आलं होतं. या दोघींच्या एन्काऊन्टरचा बदला घेण्यासाठीही कदाचित हा हल्ला केला गेला असावा असाही एक अंदाज वर्तवण्यात येत आहे.




























































