
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (दि. 30) शेवटचा दिवस असतानाही महायुतीकडून उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. सायंकाळी संभाव्य यादी जाहीर करण्यापूर्वीच तिकीटवाटपात डावलले गेल्याने तसेच गेल्या वेळी ज्याचा पराभव केला, त्यालाच उमेदवारी दिल्याने संतप्त शिंदे गटाचे इच्छूक माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी आज बंडाचे निशाण फडकवले. उद्या अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. तर तिकीट नाकारल्याने भाजपच्या सरचिटणीस धनश्री सचिन तोडकर यांनी पक्ष कार्यालयासमोर उद्या (दि. 30) सकाळी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
शाहुपुरी प्रभागातून गेल्या वेळी काँगेस नगरसेवकाचा पराभव करून विजयी झालेले आणि नंतर शिंदे गटात सामील झालेले नगरसेवक राहुल चव्हाण यांचा अखेर महायुतीतून पत्ता कट झाला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे तसेच कोल्हापूर उत्तरचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असलेले राहुल चव्हाण यांनी उमेदवारी निश्चित समजून स्वतःच्या प्रचारास सुरुवात केली होती. पत्रकेही वाटण्यात आली होती. उद्या (दि. 30) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असताना, आज त्यांना शिंदे गटातून उमेदवारी नाकारल्याचे समजले. विशेष म्हणजे गेल्या वेळी ज्याचा पराभव केला, त्यालाच तीन महिन्यांपूर्वी पक्षात घेऊन शिंदे गटातून आपल्याच विरोधात उमेदवारी दिल्याचे स्पष्ट होताच, चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. गेल्या वेळी विजयी झालेल्याला डावलण्यात आल्याचा हा दुर्दैवी व केसाने गळा कापण्याचा प्रकार असल्याची टीका करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविषयी त्यांनी सपशेल नाराजी व्यक्त केली. उमेदवारी देण्याबाबत पालकमंत्री तसेच शिंदे गटाच्या
वरिष्ठांनी आपल्याला अंधारात ठेवल्याची टीकाही त्यांनी केली. शिवाय आमचे पक्ष सोडून महायुतीतील इतर पक्षांकडून आपल्याविषयी जाणीवपूर्वक निगेटिव्ह मत तयार करण्यात येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधत, उद्या अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपकडून तिकीट नाकारल्याने येथील भाजपच्या सरचिटणीस धनश्री सचिन तोडकर यांनी थेट पक्ष कार्यालयासमोरच उद्या सकाळी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे काम करत आहे. पतीच्या निधनानंतरही स्वतःला सावरून पक्षाचे काम अखंडित सुरू ठेवले. पक्षाचा एकही कार्यक्रम वा एकही बैठक चुकवली नाही. कोल्हापूर शहरात इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा मोठे कार्यक्रम एकटी महिला असून घेतले. पण आज आपली आर्थिक परिस्थिती नसल्याच्या कारणामुळे पक्ष तिकीट नाकारत आहे. पक्षाची विचारधारा सोडू शकत नाही. तिकीट न मिळाल्याने आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने उद्या (दि. 30) सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा धनश्री तोडकर यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.
आज शेवटची मुदत
कोल्हापुरात 199 अर्ज दाखल, तब्बल 2,185 अर्जांची विक्री
कोल्हापूर ः महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याचा उद्या (दि. 30) शेवटचा दिवस असून, दुपारी दोन वाजेपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत तब्बल 2 हजार 185 अर्जांची विक्री झाली असून, 199 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तब्बल दहा वर्षांनंतर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारपासून प्रत्यक्षात सुरू झाली. सात ठिकाणी असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे.
आतापर्यंत प्रभाग 1, 2 व 5 साठी 15 अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग 3, 4 व 15 साठी 39 अर्ज, प्रभाग 6, 7 व 8 साठी 22 अर्ज, प्रभाग 9 व 20 साठी 20 अर्ज, प्रभाग 10, 11 व 19 साठी 26 अर्ज, प्रभाग 12, 13 व 14 साठी 38 अर्ज, प्रभाग 16, 17 व 18 साठी 39 अर्ज दाखल झाले आहेत.

























































