मंथन – दुष्काळाच्या झळा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

दुष्काळाचे नियोजन फार संवेदनशीलतेने करावे लागते हे 72 च्या दुष्काळाचा अनुभव असलेल्या देशाला नव्याने सांगायची वेळ आली आहे, असे सध्याचे वातावरण. जगाचा पोशिंदा म्हणून मिरवणारा शेतकरी निसर्गाच्या लहरीपणापेक्षाही शासकीय अनास्थेमुळे अधिक पिचला आहे. सांगली भागातील तरुण प्रयोगशील शेतकरी श्रेणिक नरदे यांनी दुष्काळावर केलेले हे भाष्य पुरेसे बोलके आहे.

देशावर अल निनोचे संकट आले आणि ऐन हंगामात पावसाने ओढ लावली. पीकपेरणीचं नियोजन करणारा शेतकरी आभाळाकडे खोल गेलेल्या डोळ्यांनी पाहातच पुढचे नियोजन करू लागला. शेतकऱयासाठी पाऊस म्हणजे त्याचा तारणहार. अगदी सर्वस्वच! जिथे शहरातील माणसाला पाऊस हे वातावरण वाटत असतं तर गावातील माणसासाठी पाऊस हे जीवन असतं. शहरात पडणारा पाऊस हा इथून तिथून कुठूनतरी कुठेतरी जात असतो. गावातला पाऊस मात्र रानात जिरत मुरत राहतो. यावर्षी पाऊस मातीला येऊन शिवणे हिच मोठ्ठी गोष्ट झाली होती, इतका वाईट पावसाळा कधीच अलीकडील वर्षांत आला नव्हता. पाण्याची, पावसाची ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात एखाद-दुसरा तालुका वगळता अशीच आहे.

एल-निनोचे संकट येणार हे भाकीत किंवा अंदाज हवामान विभागाने फार आधीच वर्तविला होता. तो सर्वसामान्य लोकांना माहिती होता तर शासकीय यंत्रणेला, सरकारमधील लोकप्रतिनिधींना माहीत असणे साहजिकच होते. मात्र कोणत्याही प्रकारचे गांभीर्य सरकारला दिसत नाही. सध्याच्या घडीला पावलोपावली हवामान तज्ञ झालेत. ज्यांनी शेतकऱयाला पावसाची खोटी आशा दाखवली. काही जणांनी धुळपेरणी केली, त्यांचे बियाणे जळून गेले, काहींची हातातोंडाला आलेली पिकं उभ्याने जळून गेली. शेतीची मशागत, बी-बियाणे, मजुरांचा खर्च, औषधांचा, लागवडीचा खर्च हे सगळं शेतकऱयांच्या अंगावर बसलं. त्या शेतकऱयांची दिवाळी पाच हजार रुपयांमध्ये गोड कशी व्हायची? सरकारी पातळीवरून आपल्याला जी मदत येईल त्यात आपले पुनर्वसन होणे शक्य नाही याची समज शेतकऱयांना आहे. मात्र निवडणुका, धार्मिक-जातीय वाद, वेगवेगळ्या कालसुसंगत नसलेल्या गोष्टी उकरून काढून मुख्य माध्यमांतून त्यावर चर्चा घडवून लोकांचे लक्ष वास्तवापासून कोसो दूर नेण्याने आजचे मरण सरकार जरी उद्यावर ढकलत असले तरी महाराष्ट्रात एक अस्वस्थता धगधगत आहे ती विकृत ट्रोलधाडी वापरून थांबवता येणार नाही.

शेतीच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. धरणं भरलेली आहेत. ऊस पट्टय़ातील शेतकरी साखरेचा वाढलेला दर आणि इथेनॉलचा वाढता वापर अधोरेखित करून उसाला दर मागत आहे. त्यासाठी आंदोलने उभारतो आहे. मात्र कोणतेही आंदोलन साम-दाम-दंड-भेदाने मोडून काढणाऱया सरकारने शेतकऱयाचा ऊस वाळविण्यासाठी धरणातून पाणी सोडणे बंद केले आहे. कृष्णेचे पात्र कोरडेठाक पडले आहे. एकदा ऊस वाळला की, आपोआप शेतकऱयांच्या आंदोलनातील हवा निघून जाऊन शेतकऱयांपुढे कारखान्याला ऊस पाठविण्याखेरीज दुसरा पर्यायच ठेवायचा नाही ही सरकारची चाणक्य नीती!  हे सरकार दुष्काळात शेतकऱयाचा आधार होण्याचा विश्वास शेतकऱयांनी बाळगायचा तरी कसा?  1972 चा दुष्काळ आणि 2026 चा दुष्काळ यात अनेक फरक आहेत. शहरी भागात एकदा माणूस टॉयलेटमध्ये जाऊन आल्यानंतर जे पाणी खर्च होतं तेवढय़ा पाण्यात ठिबक सिंचनाद्वारे किती रोपं जगतात हा हिशोब होईल का? शहरातील फ्लशवर विशेष काही बंधन नाहीत, पण इकडे नदीपात्रात शेतकऱयाचा ऊस जळत असताना पाणी सोडले जात नाही. हा फरकही उघडय़ा डोळ्यांनी शेतकरी बघत असतो. मात्र सरकारकडून कसल्याच ठोस उपाययोजना असल्याचे चित्र सध्यातरी दिसत नाही. शेतकऱयाच्या दावणीला अनेक जनावरे आहेत. त्याच्या चाऱयाचा प्रश्नही उभा आहे.

माझ्या गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या तुषार गुजरे या युवकाने शासनाला पत्र लिहून कळविले की, यंदा ऊसतोडणीसाठी तोडणी यंत्र न वापरता मजुरांकडून ऊसतोड करून घ्या, जेणेकरून लोकांना रोजगार मिळेल व जनावरांना चारा मिळेल. त्यावर शासन आता विचार करीत आहे, कार्यवाही करत आहे.  मात्र दुर्दैव असं की, शासनातील कुणालाच हे विचार का येत नाहीत? दुष्काळासंदर्भात उपाययोजना करण्याची, ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणाच नाही. असली तरी तिची पोहोच मर्यादित आहे. शेतीचे पाणी, पिण्याचे पाणी, वापराचे पाणी, जनावरांना चारा, अन्नधान्याची उपलब्धता, आरोग्य यांबाबत तयारी करणे ही शासनाची जबाबदारी आहे, ती सध्यातरी कोणत्या जबाबदार मंत्र्याच्या वक्तव्यातून, कोणत्या शासन निर्णयातून जाहीर होताना दिसत नाही. दुष्काळ फार संवेदनशीलता दाखवून हाताळावा लागतो. कारण तो थेट सजीवांच्या जीवन-मरणाशी संबंधित असतो. बँकांची कर्जे, विकास संस्थांची कर्जे, मायक्रो फायनान्सची कर्जे यांच्या व्याजांचं काय? त्यांच्या तगाद्याला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत, पण कुठल्याही प्राईम टाईममध्ये त्याची किंवा एकूणच दुष्काळाची चर्चा होताना दिसत नाही.

अजूनही शेतकरी मोबाईलवर बघत असतो कुठेतरी समुद्रात वादळ तयार होईल का? कमी दाबाचा पट्टा तयार होईल का? तसं वातावरण झालं तर आपल्या भागात पाऊस पडेल का? या आशेवर अजूनही तो आहे. पाऊस पडला नाही, आता एखाद्या वादळाने झालेल्या पावसाने फार काही फरक पडणार नाही याची माहिती त्याला आहे, पण त्याचवेळी सरकारबद्दलचा अविश्वासही दिसून येतो आहे.

[email protected]

 

(लेखख ‘वॉटर आर्मी‘चे संस्थापक आहेत)