
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी एफआयआर दाखल करून घेण्यास मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांची पोलीस अधिकाऱयांसोबत बाचाबाची झाली. कुणाच्या तरी पाठिंब्यामुळे पोलिसांची मग्रुरी सुरू असल्याचा आरोप करत उद्या बारामतीत पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडणार असल्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला.
रोहित पवार, अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादीचे काही आमदार आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी डीजीसीआय, व्हीएसआर कंपनीविरुद्ध त्यांना एफआयआर दाखल करायचा होता, परंतु पोलिसांनी त्यास नकार दिला. यासंदर्भात रोहित पवार यांनी विधानभवन आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.
रोहित पवार म्हणाले की, ‘सुरुवातीला आमचा वादविवाद झाला. मात्र पोलिसांनी लॅपटॉप आणला. माझे स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात आली. मात्र एक मोठे पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी एफआयआर करण्यापासून थांबवले. त्यांनी का थांबवले? त्यांना कोणाचा फोन आला?, असा प्रश्न असून आमचा संशय बळावत चालला आहे, असे रोहित पवार म्हणाले.
मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्याने उद्या सकाळी दहा वाजता बारामतीमध्ये एफआयआर दाखल करायचा प्रयत्न करणार आहोत. पोलीस ठाण्याची ती इमारतच दादांनी बांधली आहे. तिथे नाही झाले तर न्यायालयात जाऊ. ती इमारतही दादांनी बांधली आहे, असे रोहित पवार म्हणाले.
सर्व कार्यकर्त्यांना एफआयआर नोंदवण्याच्या सूचना
हा लढा केवळ आपला वैयक्तिक नसून राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेनेही आपापल्या भागात यासंदर्भात गुन्हा दाखल करावा, असे आवाहनही रोहित पवार यांनी केले.
दोन दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेणार
डीजीसीएच्या नवीन अहवालाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, आम्ही उपस्थित केलेले मुद्देच अहवालात घेण्यात आले आहेत, मात्र तरीही काही पळवाटा शोधून केवळ मोजक्या विमानांवर बंदी घालण्याची कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भाष्य करण्यासाठी आणि पुरावे मांडण्यासाठी येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
डीजीसीएच्या अधिकाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
झारखंडच्या छपरामध्ये झालेल्या अपघातानंतर एआयबीने संबंधित कंपनीच्या कार्यालयावर तत्काळ छापा टाकत चौकशी सुरू केली. मग अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात तशीच तत्परता का दिसून येत नाही, असा संतप्त सवाल अमोल मिटकरी यांनी केला. या अपघातप्रकरणी डीजीसीएच्या अधिकाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.




























































